भारतीय मोटार व्यवसायाचे राष्ट्रीयीकरणाची मागणी
नवी दिल्ली, ता. 18 – लोकसभेतील चर्चेच्या वेळी साम्यवादी सभासद टी. सी. मेनन म्हणाले, 1959 संपण्याच्या सुमारास देशी मोटार धंदा 75 टक्के देशी मोटार-भाग निर्माण करू शकेल हे उद्योगमंत्री श्री. शहा यांचे विधान विवाद्य आहे.
संरक्षण खात्याचे मंत्री मेनन यांचा अंदाजच बरोबरच आहे. देशी धंद्याला त्यांनी जो बोल लावला आहे त्याबद्दल शहा यांना काय म्हणायचे आहे? त्यावेळी शहा म्हणाले, मला वादात शिरायचे नाही. परदेशी कारखानदारांशी केलेल्या करारांचा टॅरिप धोरणाशी काहीही संबंध नाही.
यावर मेनन म्हणाले, मंत्री व्यापर उद्योग खात्यातर्फे बोलत आहेत का भारत सरकारतर्फे? यावर शहा म्हणाले, “अर्थात मी सरकारच्या वतीने बोलतो आहे.’ मोटार व्यवसाय सरकारने आपल्या ताब्यात घ्यावा अशी मागणी टी. सी. मेनन यांनी केली. या व्यवसायातील खासगी लोकांनी राष्ट्राचा व राष्ट्रातील जनतेचा घात केला आहे.
इंग्रजी शिक्षणावाचून मुळीच तरणोपाय नाही- देशमुख
पाटणा – इंग्रजी शिकण्याची फार जरुरी आहे. कुठल्याही विशिष्ट विषयाचे-विशेषतः तांत्रिक ज्ञान इंग्रजी आल्यावाचून अपुरे राहील असे विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष चितांमणराव देशमुख यांनी सांगितले.
ज्ञानसमृद्धीसाठी परकीय भाषांची मदत होते असे सांगून ते म्हणाले, इंग्रजी या दृष्टीने विद्यार्थ्यांना अधिक उपयुक्त वाटेल. आपण इंग्रजीची उपेक्षा करणे घातक ठरेल. पाटणा विद्यापीठाच्या नव्या ग्रंथालय इमारतीची पायाभरणी देशमुख यांच्या हस्ते झाली.
या प्रसंगी ते बोलताना म्हणाले, विद्यापीठ अनुदान मंडळाने विद्यापीठीय ग्रंथालयाची पाहणी केली तेव्हा इंग्रजी पुस्तके वाचण्याचा विद्यार्थी कंटाळा करतात असे दिसले. 75 टक्के पुस्तके प्रादेशिक भाषेतील वाचली जातात. त्यापैकी 90 टक्के कादंबऱ्या असतात. याचा अर्थ, विद्यार्थी गांभीर्याने वाचन करीत नाहीत. विद्यापीठीय विद्यार्थ्यांची वाचनाची सवय सुधारण्यासाठी काहीतरी करण्याची जरूरी आहे. या ग्रंथालयात दोन लाख पुस्तके ठेवण्यात येतील.