पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 21 मार्च रोजी होत आहे. या परीक्षेला सामोरे जाताना ज्या उमेदवारांना करोनाची लक्षणे असल्यास, त्यांना पीपीई किट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला आहे.
एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षा दि. 14 मार्च रोजी होणार होती. मात्र, करोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, पुण्यासह राज्यभरात हजारो उमेदवारांनी रस्त्यावर उतरत ही परीक्षा वेळेत घेण्यासाठी आंदोलन केले. त्याची दखल घेत राज्य सरकारने ही परीक्षा दि. 21 मार्च रोजी घेणार असल्याचे जाहीर केले.
त्यानुसार करोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी मानक कार्यप्रमाणाली (एसओपी) शुक्रवारी प्रसिद्ध केली. परीक्षा केंद्रात प्रवेश करताना किमान तीन पदरी कापड्याचा (मास्क) परिधान करणे अनिवार्य आहे. तसेच परीक्षा कक्षामध्ये मास्क, हातमोजे व सॅनिटायझर असलेले किट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा वापर करणे उमेदवारांना अनिवार्य राहील.
उमेदवरांना सूचना
– हात सतत सॅनिटायझ करणे आवश्यक आहे.
– करोनाची लक्षणे असल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांना आधी कळवावे. अशा उमेदवारांना – मास्क, हातमोजे, फेस शिल्ड, मेडिकल गाऊन, मेडिकल शू कव्हर, मेडिकल कॅपचा समावेश असलेले पीपीई किट उपलब्ध करून दिले जाणार आहे.
– करोना संशयितांची परीक्षा स्वतंत्र कक्षामध्ये बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे.
– शारीरिक अंतर राखण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्रावरील माहिती फलक, सांकेतिक चिन्हे, भित्तीपत्रिका इत्यादी सूचनांचे पालन करावे.
– परीक्षेनंतर केंद्राबाहेर जाताना शारीरिक अंतर राखणे अनिवार्य आहे.
– वापरलेले टिश्यू पेपर, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर पाऊच इत्यादी वस्तू कुंडीमध्ये टाकावीत