मुंबई : उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटका प्रकरणी एनआयए संशयित आरोपी सचिन वाझे यांची कसून चौकशी करत आहे. याच पार्श्वभूमीवर घटनास्थळावर सचिन वाझे यांना आणून घटनेचे नाट्यरुपांतर करण्यात आले असून यातून घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यानंतर सीसीटिव्हीमध्ये जे फुटेज मिळाले त्याप्रमाणे हे नाट्यरुपांतर करण्यात आले आहे. जवळपास अर्धा तास हे रुपांतर चालू असल्याचे सांगण्यात येत आहे.
स्फोटके ठेवल्यानंतर स्कॉर्पिओ वाहनातून पीपीई किट सदृष्य झब्बा घालून एक व्यक्ती मागील बाजून उतरुन निघून गेला होता. हे सर्व दृष्य सीसीटिव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले आहे. ही व्यक्ती सचिन वाझे असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे या व्यक्तीची चाल ही सचिन वाझे यांच्या सारखी आहे का? हे पाहण्यासाठी सचिन वाझे यांनी घटनास्थळी आणून फुटेजमधील व्यक्तीप्रमाणे चालण्यास सांगण्यात आले होते.
यासाठी अगोदर सर्व ठिकाणी मार्किंग केले होते. घटना रात्रीच्या असल्याने हे नाट्यरुपांतरासाठी रात्रीची वेळ निवडल्याचे सांगितले जाते. सचिन वाझे यांची नैसर्गिक चाल ओळखण्यासाठी त्यांना अनेकदा चालण्यास सांगितले जात होते. हे सर्व कैद करण्यासाठी कॅमेराही सीसीटिव्ही रिझोल्युशनचा वापरल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी कॅमेरा शिडीच्या माध्यमातून सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या उंचीवर लावला होता.
सचिन वाझे यांना सुरुवातीला पँट-शर्टमध्ये विशिष्ठ ठिकाणावरुन चालण्यास सांगण्यात आले. यानंतर त्यांना कुर्ता घालूनही दोनतीन वेळा चालायला लावले. यावेळी त्यांच्या डोक्याला रुमाल बांधलेला पहायला मिळाला. हे सर्व नाट्यरुपांतर संग्रहित करण्यासाठी पुण्यावरुन खास फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले होते. या पथकाने हे सर्व पुरावे आपल्या सोबत तपासासाठी घेतले आहेत. जवळपास अर्धा तास हे नाट्यरुपांतर सुरु होते.
दरम्यान, सचिन वाझेंच्या अडचणीत आता आणखीन वाढ होण्याची चिन्ह आहेत. सचिन वाझे चौकशीत सहकार्य करत नाही. एनआयएने मुंबई सत्र न्यायालयात याचा पुनरूच्चार केला आहे. तसेच परवानगी देऊनही सचिन वाझेंचे वकील चौकशीच्यावेळी उपस्थित राहत नसल्याचे एनआयएने न्यायालयाला सांगितले आहे. दरम्यान ठाणे सत्र न्यायालयात सचिन वाझेंनी दाखल केलेल्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी 30 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली. तर ठाणे सत्र न्यायालयाकडे शुक्रवारी एटीएसला वाझेंचं प्रॉडक्शन वॉरंट जारी केले आहे.