नागपूर – युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांना नागपूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. कुणाल राऊत हे राज्याचे माजी मंत्री नितीन राऊत यांचे सुपुत्र आहेत. कुणाल राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी संध्याकाळी नागपूर जिल्हा परिषदेत जाऊन “मोदी की गॅरंटी” अशा आशयाच्या पोस्टर्सवर काळे फासले होते. तसेच मोदी या शब्दावर भारत असे स्टिकर लावून पोस्टर्सवर खोड केली होती. त्यानंतर पोलिसांनी आता त्यांना अटक केली आहे.
या प्रकरणी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना शनिवारी नोटीस बजावून हजर राहण्यास सांगितले होते. मात्र कुणाल राऊत आणि त्यांचे सहकारी सकाळपासूनच बेपत्ता होते. त्यानंतर नागपूर जिल्ह्यातील कुही या ठिकाणाहून कुणाल राऊत यांना ताब्यात घेत अटकेची कारवाई केली.
दरम्यान, पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले.
सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.