नागपूर, – युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासल्या प्रकरणी कुणाल राऊत यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. कुणाल राऊत यांची रवानगी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हा परिषदेत पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी रविवारी नागपूर पोलिसांनी कुणाल राऊत यांना अटक केली होती. कुणाल राऊत यांना सोमवारी सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाविणत आली. दरम्यान, कुणाल राऊत यांच्यावरील कारवाईचा कॉंग्रेसकडून निषेध करण्यात आला.
युवक काँग्रेसच्या नेत्याला रविवारी व्हॉट्सॲपद्वारे फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 41-अ अंतर्गत नोटीस बजावण्यात आली होती. या नोटीसीत राऊत यांना सोमवारी दुपारी पोलिसांसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले होते. मात्र रविवारीच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली, असा आरोप कॉंग्रेसकडून करण्यात आला.
काय घडलं होत नेमकं काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान
पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांच्या पैशातून केवळ स्वतची प्रसिद्धी करत आहेत. असा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने शनिवारी आंदोलन करत नागपूरात जिल्हा परिषदेत लावण्यात आलेल्या पोस्टरवर मोदी ऐवजी भारत शब्दाचे स्टिकर्स चिटकवले.सोबतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे देखील फासले. या आंदोलनामुळे नागपूर जिल्हा परिषदेत काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.