कोथरूडमध्ये राजकीय रंग, चर्चा जोरात

कोथरुड- 210

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील वातावरण तापू लागले असून चर्चांना रंग भरला आहे. इच्छुकांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. अनेक कार्यक्रमांतून असणाऱ्या त्यांच्या उपस्थितीमधून हे सध्या दिसत आहे.

2014 च्या निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपचा आमदार कोथरूड मतदारसंघातून निवडून आला. आता 2019 साठी युती होण्याची चर्चा असल्याने हा मतदारसंघ शिवसेना कोणत्याही परिस्थितीत घेईल, असे शिवसैनिकांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास कोथरूडचा आमदार पुन्हा शिवसेनेचा होईल, अशी चर्चा आहे. भाजपकडून याबाबत कोणतेही सुतोवाच करण्यात आलेले नाही. उलट ज्या जागांवर भाजप आमदार आहेत, त्या भाजपाकडेच राहतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे इच्छुक तयारीला लागले आहेत.

प्रत्येक पक्षाच्या इच्छुकांनी चाचपणी आणि गाठीभेटीही सुरू केल्याचे आहे. शिवाजीनगर मतदारसंघातून वेगळा होऊन निर्माण झालेल्या कोथरुड मतदारसंघाच्या पहिल्या 2009 च्या निवडणुकीच्या वेळी कोथरूडचा पहिला आमदार कोण होणार, अशी उत्कंठा होती. युतीचे तिकीट म्हणजे कोथरूडचे आमदारपद नक्की, असे त्यावेळी मानले जात असले, तरी मनसेचे वारेही त्यावेळी जोरात होते. सेनेतील इच्छुकांवर मात करत चंद्रकांत मोकाटे यांनी उमेदवारी आणि विजय पटकावत आमदारपद मिळवले. या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपचे अण्णा जोशी यांना उमेदवारी देत “आम्हीही ब्राह्मण उमेदवार देतो’ हे दाखवून दिले, पण त्याचा फारसा फायदा राष्ट्रवादीला झाला नाही. मनसेचे किशोर शिंदे यांनी चांगली फाईट दिली होती. तर अपक्ष उमेदवार दीपक मनकर यांनी निर्णायक मतदान घेतले होते.

2014 च्या निवडणुकीत युतीची झालेली फाटाफूट व मोदी लाट यामुळे सर्व राजकीय गणितेच बदलून गेली. सेना भाजप एकमेकांसमोर उभे ठाकल्यानंतर बालेकिल्ल्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या भागात भाजपला मानणारा असणारा वर्ग आणि मोदी लाट यामुळे भाजपच्या उमेदवार मेधा कुलकर्णी यांनी आरामात विजयश्री खेचून आणली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचे चंद्रकांत मोकाटे यांचे स्वप्न अपुरे राहिले. मनसेची लाट ओसरल्याने 2014 च्या निवडणूकीत किशोर शिंदे यांची चांगलीच पीछेहाट झाली होती. राष्ट्रवादीचे बाबूराव चांदेरे यांनी जोरदार प्रयत्न केला पण मोदी लाटेत त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. कॉंग्रेसचे उमेदवार उमेश कंधारे यांना अल्प मतांवर समाधान मानावे लागले होते.

पण, यंदा निवडणूक कोणत्याच पक्षासाठी सोपी नसणार आहे. अनेक राजकीय समीकरणे बदलली जाणार आहेत. विद्यमान आमदार प्रा. मेधा कुलकर्णी नागरीप्रश्‍न, सहकारी सोसायट्यांच्या आडचणी सोडवण्यात पुढे दिसत असल्या, तरी मतदारसंघासाठी एखादा मोठा प्रकल्प आणण्यासाठी अपयशी ठरल्याची टीका विरोधक करत आहेत. भाजपमधील इतर तुल्यबळ नेते उमेदवारीसाठी इच्छुक आहेत त्यामुळे रस्सीखेच होणार, हे नक्की आहे. त्यामुळे युती झाली तर मतदारसंघ कोणाला सुटणार व युती नाही झाली, तर सेना व भाजपचा उमेदवार कोण असणार हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे.
आघाडीच्या जागा वाटपात हा मतदार संघ राष्ट्रवादीला सुटणार असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे त्यांचीही जोरदार तयारी आहे. राष्ट्रवादीला मानणारा वर्गही या मतदार संघात मोठा आहे. पक्षाच्या मतांबरोबरच वैयक्तिक ताकद असणारा उमेदवार राष्ट्रवादीने दिल्यास एक चांगली लढत या ठिकाणी पहायला मिळू शकते. माजी नगरसेवकांसह तीन ते चार जण या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादी व कॉंग्रेस वेगवेगळे लढले होते. त्यावेळी तुटपुंज्या मतांवर कॉंग्रेस पक्षाला समाधान मानावे लागले. पण यंदा आघाडी असल्याने राष्ट्रवादीची ताकद थोडी वाढण्याची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.