पुणे – पोलिसांना पाहून चोरट्यांनी धुम ठोकल्याचे आपण आजवर ऐकले असेल. मात्र पुण्यात चक्क पोलिसांनीच चोरट्यांना पाहून धुम ठोकल्याचा प्रकार घडला आहे. तेव्ही पोलिसांच्या हातात एसएलआर गन असताना हा प्रकार घडला. संबंधीत दोघा पोलीस कर्मचाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यावर हा राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे.
औंध परिसरात सिध्दार्थनगर भागात शैलेश टॉवर सोसायटी येथे 28 डिसेंबर रोजी मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास चार चोरटे घरफोडी चोरी करण्यास शिरले होते. सोसायटीचे सुरक्षारक्षकास चोरटयांनी चाकूचा धाक दाखवला आणि पकडून ठेवले. तर, तीन जणांनी सोसायटीच्या इमारतीत शिरुन कटरच्या सहाय्याने फ्लॅट फोडून चोरी करु लागले.
दरम्यान, चोरटे घरफोडी करत असल्याची कुणकुण लागल्याने समोरच्या सोसायटीतील कोणीतरी ही बाब पोलीस नियंत्रण कक्षास फोनद्वारे कळवली. थोडयावेळात चतुश्रंगी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल अनिल अवघडे व संतोष गोरे तेथे दुचाकीवर आले. त्यांची दुचाकी सोसायटीच्या गेटपाशी येण्यास व चोर गेटमधून बाहेर पडण्यास एकच वेळ झाली.
चोरांनी पोलिसांना बघुन मारा यांना असे म्हणातच दुचाकी चालवणाऱ्या मार्शलने दुचाकी यु टर्न घेऊन पळ काढला. मात्र एसएलआर गन असणारा मार्शल खाली उतरल्याने तो तेथे अडकला. तो जीवाच्या भितीने एकटाच घाबरुण थांबला.
दरम्यान चोरट्यांनी त्याच्या समोरुन चोरीचा ऐवज घेऊन गाडीकडे पळ काढला. चोरटे त्यांची दुरवर लावलेली कार घेऊन पळून गेले. त्यानंतर त्यांच्यामागून चालत चालत गनवाला मार्शल निघुन गेला. हे सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले. हे फुटेज व्हायरल झाल्यावर सर्वत्र पुणे पोलिसांची नाचक्की झाली.