मुंबई – कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळांवर घ्यावयाची दक्षता त्याचबरोबर पर्यटकांनी घ्यावयाची काळजी यासाठी पर्यटन संचालनालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. तसेच रेस्टॉरंटस्, बार सुरू करण्याबाबतही नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मिशन बिगीन अगेन अंतर्गत 21 डिसेंबर 2020 रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे आदी सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना करोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्या अनुषंगाने पर्यटन संचालनालयामार्फत नवीन कार्यप्रणाली जारी करण्यात आली. तथापि, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनी पर्यटनस्थळांसंदर्भात काही निर्बंध, सूचना जारी केलेल्या असतील तर त्या बंधनकारक असतील, असे एसओपीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
पर्यटनस्थळांवर मास्कचा वापर, सॅनियाटयजरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आदींचे पालन करावे. गर्दी टाळण्यासाठी सुविधा उपलब्ध असल्यास पर्यटनस्थळांचे ऑनलाइन तिकीट बुकींग करावे, पर्यटनस्थळांवर फक्त लक्षणे विरहीत पर्यटकांनाच परवानगी असेल, 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, 10 वर्षाखालील मुले, गंभीर आजार असणाऱ्या व्यक्ती आदींनी घरीच थांबावे, पर्यटकांनी शक्यतो चलन वापरण्याचे टाळून डिजीटल पेमेंटवर भर द्यावा, अशा विविध सूचना पर्यटकांसाठी देण्यात आल्या आहेत.
पर्यटनस्थळांवर करोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याबाबत पोलीस विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन आणि संबंधीत विविध विभागांतील प्रतिनिधींची कोव्हीड 19 टीम बनविण्यात यावी, या टीमने पर्यटनस्थळांवर गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. पर्यटनस्थळांवर किती पर्यटकांना प्रवेश द्यायचा यासंदर्भात निर्णय घ्यावा, असे सूचित करण्यात आले आहे.