10 महिलांची सुटका
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी विभागाने आज पहाटेच्या सुमारास एका डान्सबारवर छापा घालून 10 महिलांची सुटका केली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी 22 जणांना अटक केली आणि 10 महिलांची सुटका केली. यावेळी 94 हजार रुपयांची रोख रक्कमही ताब्यात घेण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मालाडच्या पूर्व भागातील पोद्दार रोडवरील लक्ष्मी नारायण शॉपिंग सेंटरमधील काका बार ऍन्ड रेस्टॉरंटवर छापा घातला. छापा घातला तेंव्हा बारमधील कामचलाऊ डान्सफ्लोअरवर काही मुली डान्स करत होत्या.
पोलिसांचे खबरी असल्याचे भासवणाऱ्या काही घटकांकडून या डान्सबारच्या माध्यमातून अनैतिक धंदे केले जात होते. यावेळी पोलिसांनी अटक केलेल्या 22 जणांमध्ये 14 ग्राहक, 5 कर्मचारी, वेटर, सुपरवायजर, मॅनेजर आणि कॅशिअरचा समावेश आहे, असे डीसीपी शिवदीप लांडे यांनी सांगितले. या छाप्याप्रकरणी दिंडोशी पोलिस ठाण्यामध्ये प्रकरण दाखल करण्यात आले आहे.