नगर- घाटकोपर येथे राहात असलेल्या एका 30 वर्षीय महिलेला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. घाटकोपर येथून त्यांच्या मूळ गावाकडे परतत असताना या महिलेला त्रास जाणवत होता. मात्र, नगरमध्ये आल्यावर रस्त्यातच जास्त त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी येथील जिल्हा रुग्णालयात तपासणी करून घेतली. आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे तिची तात्काळ तपासणी करण्यात आली होती. त्यात ती महिला बाधित असल्याचे आढळून आले. पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल प्राप्त झाले.
त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. ही करोनाबाधित महिला आणि तिचा पती हे मुंबईत घाटकोपर येथे राहात असून प्रवासात जास्त त्रास जाणवू लागल्याने तिला नगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करून तिची तपासणी करण्यात आली होती. त्यावेळी तिला सर्दी, ताप आणि खोकला याचा त्रास जाणवत होता. तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्यात ती बाधित असल्याचे आढळले. मात्र, तिच्या पतीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तो मुंबईमध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे.