आंबेठाण/नारायणगाव -ग्रामीण भागातील नागरिकांची करोनाची चाचणी करण्यासाठी पुण्यातील रुग्णालयात जावे लागते. हा त्रास वाचावा म्हणून शिरूर लोकसभा मतदारसंघातील काही गावांमध्ये चाचणी केंद्र उभारण्याची मागणी प्रशासकीय बैठकीत केली होती. त्यानुसार खेड तालुक्यातील महाळुंगे इंगळे येथील कोविड केअर सेंटरमध्ये चाचणी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिली.
पुणे जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने तसेच विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून 1450 रुग्णांसाठी हे कोविड केअर सेंटर उपलब्ध होणार असून, या ठिकाणी कोविड-19 साठी लागणाऱ्या टेस्टिंग लॅब देखील सुरू करण्यात आल्या आहेत. महाळुंगे येथील कोविड केअर सेंटरची पाहणी डॉ. कोल्हे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी आमदार दिलीप मोहिते, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य समितीचे सभापती प्रमोद काकडे, उपविभागीय अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संतोषकुमार देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी संजय तेली, तहसीलदार सुचित्रा आमले, गटविकास अधिकारी अजय जोशी, चंद्रकांत इंगवले, महाळुंगेच्या सरपंच राधा इंगवले, मर्सिडीज बेंझ, सिस्का एलईडी, सांकला ग्रुपचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
जिल्हा परिषद प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली व मर्सिडीज बेंझ इंडिया, सिस्का एलईडी व सांकला ग्रुपच्या सहकार्यातून म्हाळुंगे येथील कोविड केअर सेंटरमध्ये चाचणी केंद्र उभे करण्यात आले असल्याचे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.