नगर -शारीरिक व मानसिक त्रास देत कोतवाली पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांनी अनेक वेळा पदाचा गैरवापर करून अत्याचार केला. तसेच अनेक वेळा मला मारहाण करीत मुलाला व आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद कोतवाली पोलीस ठाण्यात एका महिलेने दिली आहे. त्यानुसार वाघ यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी माझा 9 वर्षांचा मुलगा व वयोवृद्ध आईसह राहते. दोन वर्षांपूर्वही मी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता,
पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक विकास वाघ यांच्याशी माझी ओळख झाली. तेव्हा त्यांनी तक्रारीबाबत माहिती देण्याचा बहाणा करून माझा फोननंबर घेऊन फोन करण्यास सुरुवात केली. त्यानंतर घरी येणे-जाणे सुरू केले. एके दिवशी कमरेची रिव्हॉल्व्हर काढून तिचा धाक दाखवून माझ्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेक वेळामाझ्या एकटेपणाचा फायदा घेत त्यांनी शारीरिक अत्याचार केला. तसेच पदाचा गैरवापर करून मला याची वाच्यता न करण्याची धमकी दिली. तसेच त्यांनी अनेक कागदांवर माझ्या सह्या घेतल्या. तसेच मी त्यांना पैसे मागत असल्याच्या मोबाइलवरील रेकॉर्डिंग तयार करून घेतल्या.
त्यानंतर मला नोटरी ऑफिसमध्ये नेवून माझा त्यांच्याशी कुठलाही संबंध नसल्याची नोटरी तयार करून त्यावर माझी जबरदस्तीने सही घेतली. त्यानंतर मी पुन्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात तक्रार देण्यास गेले असता, त्यांनी मला व्हॉट्स ऍपवर मेसेज पाठवून मी तुला खंडणी सारख्या मोठ्या गुन्ह्यात अडकवीण, अशी धमकी दिल्याचे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.