राजगुरुनगर : खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी कोरोना मुक्त होऊन घरी परतल्यानंतर खेड पोलीस ठाण्यातील सहकारी पोलीस व ते राहत असलेल्या नागरिकांनी ‘करोना योध्याचा ‘ फटाके वाजवून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून स्वागत केले.
खेड पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी हे गेले 4 महिने खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत “कोरोना योद्धा” बनून काम करत होते. कर्तव्याबरोबरच करोनापासून सर्वाना वाचविण्यासाठी मोठा सहभाग घेतला होता. राजगुरूनगर शहरात व तालुक्यातील अनेक गावात लॉकडाऊन काळात व नंतरही त्यांनी कोरोना संसर्गाचा प्रादुभार्व वाढू नये यासाठी दिवसरात्र काम केले. स्वतः रस्त्यावरून उतरुन नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीवर अटकाव करण्यात यश मिळवले होते.
खेड पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सूचना देऊन, कंटेनमेंट झोन असतील त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त चोखरित्या लावण्यात यशस्वी झाले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेक राज्यातील व परराज्यातील कामगार रस्त्याने पायी जात असताना त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांना जेवणाची सोय केली होती.
मात्र, कर्तव्य बजावत असतानाच (दि.१८ जुलै) रोजी त्यांना एका आजाराचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोरोना स्वब चाचणी करून घेतली. त्यात स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु होते. आज (दि.२४ ) त्यांना रुग्णालयातून डिर्चाज देण्यात आला.
राजगुरूनगर येथे पोलीस निरीक्षक राहत असलेल्या सोसायटीमध्ये त्यांचे नागरिक व पोलीस सहकाऱ्यांच्या वतीने फटाके वाजवून, फुलांचा वर्षाव करीत व टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पोलिस उपनिरीक्षक भारत भोसले, राज्य पाटील संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, राक्षेवाडीचे पोलीस पाटील पपू राक्षे, पोलीस हवालदार संतोष मोरे, राजेश नलावडे, संजय नाडेकर, शिवाजी बनकर, संदिप भापकर, विकास पाटील, विजय सर्जिने, नागेश आस्टुळे, मंगेश अभंग, शंकर भवारी, अमरदीप वंजारी यांच्यासह सोसायटी मधील नागरिक उपस्थित होते.