निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रुट मार्च
डोर्लेवाडी- बारामती विधानसभा मतदारसंघात निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी पोलिसांनी शनिवारी (दि. 12) बारामती तालुक्यातील झारगडवाडी, सोनगाव, खताळपट्टा, मेखळी, निरावागज, घाडगेवाडी, खांडज, शिलवली, माळेगाव, काटेवाडी, कन्हेरी, सावळ, रुई या गावात रूट मार्च आणि पथसंचलन केले. मात्र, अचानक आलेला पोलिसांचा ताफा पाहून ग्रामीण भागातील नागरिकांना धक्का बसला मात्र, तो ताफा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असल्याने नागरिकांना देखील पोलिसांचे कुतूहल वाटले.
कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. सर्व जनतेला व्यवस्थितरित्या मतदान करता यावे, भयमुक्त वातावरणात, शांततेत आणि सुरळीत ही निवडणूक पार पडावी यासाठी शनिवारी बारामती तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये पोलिसांचा रूट मार्च आणि पोलीस संचलन करण्यात आले. यात बारामती तालुक्याचे एक पोलीस निरीक्षक, एक उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी 60 तसेच ओरिसा राज्यांचे एक पोलीस उपअधीक्षक, चार पोलीस निरीक्षक, पोलीस कर्मचारी 67 असे एकूण 134 जण यात रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते, अशी माहिती बारामती तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक नारायणराव पवार यांनी दिली.