पुणे शहरात अवैध गुटखा विक्री व वाहतूक करणाऱ्या 29 जणांवर पोलिसांकडून कारवाई

पुणे – शहरात अवैध गुटखा विक्री आणि वाहतूक करणाऱ्या 29 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 12 लाख 64 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दोन दिवसांपुर्वीच अवैध गुटखा विक्रीतून जमलेले पैसे हवालामार्फत वर्ग करणाऱ्या चार कार्यालयांवर छापे टाकून साडेतीन कोटीची रोकड जप्त केली होती.

अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्त पुणे शहर म्हणून पदभार स्विकारल्यानंतर शहरातील अंमली पदार्थ विक्री, गुटखा विक्री वगैरे अवैदय धंदयावर व इतर अवैध कारवायांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समूळ उच्चाटन करण्यासंदर्भात आदेश सर्व पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना दिले आहेत. त्यानूसार मागील काही दिवसांत शहरात अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरु झाला आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना शहरात वेगवेगळया ठिकाणी महाराष्ट्रात प्रतिबंध असणाऱ्या गुटख्याची विक्री व वाहतूक अवैधरित्या होत असलेबाबत खबर मिळाली होती. त्यानूसार त्यांनी सर्व पोलीस स्टेशनला तसेच गुन्हे शाखेला त्याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले. याच आदेशादरम्यान 20 नोव्हेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करण्यासाठी पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची विविध पथके स्थापन करुन शहरातील विविध पोलीस ठाण्याअंतर्गत गुटखा अवैधरित्या विक्री करणारे लोकांवर 12 गुन्हे दाखल करुन 18 जणांवर करवाई करण्यात आली.

त्यामध्ये 22 लाख 27 हजार 50 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. त्यानंतर दि. 3 डिसेंबर रोजी अमिताभ गुप्ता यांना पुन्हा पुणे शहरातील हडपसर, कोंढवा, वानवडी, फरासखाना, खडकी, विमानतळ, कोथरुड, वारजे, उत्तमनगर या पोलीस स्टेशनच्या हददीत अवैधरित्या गुटखा विक्री व वाहतुक होत असल्याबाबत खबर मिळाली.

त्यानुसार पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांची 33 पथके स्थापन करुन वरील पोलीस ठाण्याच्या हद्दीत छापे टाकून 23 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सदर कारवाईमध्ये 29 आरोपींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 12 लाख 26 हजार 463 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिंबध केलेला गुटखा व सिगारेट व वाहने जप्त करण्यात आली आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.