नागरिकांवर बंधने घालण्याबाबत सर्व अधिकार प्रदान
पुणे – शहरातील प्रतिबंधित क्षेत्रासाठी(मायक्रो कंटेन्मेंट झोन) सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत दूध, भाजीपाला, फळे मटण व चिकन दुकाने सुरू असतात. तर दवाखाने, रुग्णालये, प्रसूतिगृहे आणि मेडिकल दुकाने नेहमीच्या वेळेपर्यंत सुरू असतात. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रात खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता किराणा आणि मटण-चिकनची दुकाने निर्धारित वेळेपेक्षा अगोदर बंद करण्याचे अधिकार स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले आहेत. ते परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बंधने घालू शकतात.
समर्थ, खडक आणि फरासखाना पोलीस ठाणे हद्दीतील सर्व परिसर करोना मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व परिसर सील करण्यात आल्याने तेथे नागरिकांवर सर्वांत जास्त बंधने आहेत. या भागात भाजी, दूध, किराणा आणी मटण-चिकन विक्रीस 10 ते 2 ही वेळ आहे. यामुळे खरेदीसाठी झुंबड उडते. तर जादा भाव मिळत असल्याने भाजीपाला विक्रेते पदपथावर दुकान मांडतात. यामुळे तेथे नियमांचा फज्जा उडत होता. ही बाब लक्षात घेता, नियम न पाळणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याचे आदेश स्थानिक अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
पोलीस म्हणतात…
करोनाची साथ आटोक्यात आणण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. नागरिक, भाजी विक्रेते आणि दुकानदार यांना नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन करुनही ते दुर्लक्ष करतात. यामुळे आम्हाला अनेकदा कडक पावले उचलावी लागतात. याचाच एक भाग म्हणून ठिकठिकाणी विनापरवाना बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांना हटकले जात आहे. तर नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानांचे शटर बंद केले जात आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.