प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत किमती ऐवजावर डल्ला
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसेसमधील चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांकडून बसने सुरक्षित प्रवास कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी होत आहे.
पीएमपीकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांसह शहरालगतच्या परिसरात बससेवा देण्यात येते. दिवसेंदिवस पीएमपी सेवेमध्ये सुधारणा होत आहे. मात्र, या चोऱ्यांचे प्रमाण कमी होत नसल्याचे चित्र आहे. बस आणि थांब्यांवरील प्रवाशांचे दागिने, मोबाइल यासह किंमती ऐवजांवर चोरटे हात मारत आहेत. बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याने हे प्रकार घडतात.
चोरटे बऱ्याचदा ढकलाढकली करत लक्ष विचलित करतात. दर आठवड्याला चोरीच्या किमान 5 घटना घडतात. पीएमपीकडून याबाबत ठोस पाऊल उचलण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. तर, दुसरीकडे गर्दीच्या मार्गांवरील बसेसवर पोलिसांनी पेट्रोलिंग करावे, अशी मागणीदेखील प्रशासनाकडून यापूर्वी केल्याचे पीएमपीचे अधिकारी सांगतात.
शहरातील शाळा, महाविद्यालये असणाऱ्या मार्गांवर प्रवाशांची अधिक गर्दी असते. त्या तुलनेत बसेसची संख्या कमी असल्याने उपलब्ध बसेसने प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. पीएमपी बसमधून माझ्या मोबाइलची चोरी झाली आहे. त्यामुळे गर्दीतून प्रवास करताना कायमच चोरीची धास्ती असल्याचे मत विद्यार्थिनीने व्यक्त केले.
…तर महिलांच्या छेडछाडीलाही आळा
सूस रोड ते डेक्कन आणि डेक्कन ते फातिमानगर मार्गावर प्रवास करताना माझ्यादेखील पर्सची चोरी झाली होती. यामध्ये पैसे आणि महत्त्वाची कागदपत्रे होती. याशिवाय काही परिचितांबाबतदेखील प्रसंग घडला आहे. याशिवाय अनेक बसेसमध्ये सीसीटीव्ही बसवलेच नाहीत. तर जेथे आहेत तेथील बंद आहेत. यासह दरवाज्यात उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना बंदी हवी. सीसीटीव्ही बसवल्यास केवळ चोरीच नाही. तर महिलांच्या छेडछाडीचे प्रमाणही कमी होण्यास मदत होईल, अशी मागणी ज्येष्ठ प्रवासी आशा शिंदे यांनी व्यक्त केली.