परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने ‘या’ चार राज्यांकडून न्यायालयाने मागवला अहवाल

सर्वोच्च न्यायालयाकडून देशातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त

नवी दिल्ली : देशात पार पडलेल्या सण उत्सवानंतर अनेक राज्यांमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक झाला आहे. या परिस्थितीवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच महाराष्ट्रासह चार राज्यांना सद्य परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. करोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील करोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. “दिल्लीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारने दाखल करावा,” असे निर्देश न्यायालयाने दिल्ली सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत,” असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

सर्वच राज्यांमध्ये करोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं आम्ही ऐकत आहोत. त्यामुळे सर्व राज्यांनी सद्यपरिस्थितीचा अहवाल सादर करावा. राज्यांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती तयारी केली नाही, तर डिसेंबरमध्ये परिस्थिती यापेक्षाही भयंकर होऊ शकते. त्यामुळे संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना आणि रुग्णांच्या हाताळणीसंदर्भात राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.