पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- लोणंद ते फलटण ट्रेनचा वेग वाढविणे, फलटण ते बारामती आणि फलटण ते पंढरपूर नवीन मार्गिका सुरू करण्याचा प्रकल्पाला गती देण्याच्या सूचना मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी फलटण स्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान दिल्या.
यावेळी खासदार रणजित नाईक निंबाळकर, मुख्य प्रशासकीय अधिकारी अवनीशकुमार पांडे, पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते
नीरा नदीवरील पुलाच्या बांधकामाच्या जागेला त्यांनी यावेळी भेट दिली. येथील पूल 7 स्पॅन गर्डर्ससह बांधला जाणार आहे. जो सध्या मध्य रेल्वे वर्कशॉप, मनमाड येथे तयार केला जात असून, लवकरच तो पूर्ण होईल असे यादव यांनी सांगितले. तसेच फलटण स्थानकाची सविस्तर पाहणी करून फलटण स्थानकाच्या विकासाच्या कामाचा व इतर अनुषंगिक प्रकल्पांचा आढावा घेतला. तसेच फलटण ते बारामती मार्गाची जलद अंमलबजावणी आणि फलटण-पंढरपूर प्रकल्पाची सद्यस्थिती या विषयांवर चर्चा करण्यात आली.