पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- हवामानात सतत होत असलेला बदल आणि नवनवीन विषाणूंच्या संसर्गामुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: अॅडिनो व्हायरसमुळे सर्दी, ताप, घसा दुखणे, डोळे लाल होणे अशी लक्षणे मुलांमध्ये आढळून येत आहे. त्याचबरोबर गालगुंडचे (गालफुगी) रुग्णांमध्ये वाढ होत आहे.
गालगुंड हा पॅरामिक्झोव्हायरस या विषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. चेहऱ्यांच्या दोन्ही बाजूंच्या लाळग्रंथींवर (पॅराटिड ग्लॅंड) परिणाम करतो. विषाणू संसगार्मुळे या ग्रंथींना सूज येते. त्यामुळे कानाच्या खालचा जबडा व गाल फुगलेले दिसतात. सध्या आठ वर्षांखालील मुलांमध्ये गालगुंडाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे.
गोवर, गालगुंड आणि रुबेला (एमएमआर) लसीकरणाचे वेळापत्रक विस्कळीत झाल्यामुळे आणि कोविड-१९ नंतर रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे गालगुंडाचे प्रमाण वाढले आहे. हा विषाणू हवा आणि लाळेद्वारे पसरतोय. लसीकरण केलेल्या मुलांमध्ये गालगुंड हा सामान्यत: एक सौम्य आजार असला, तरी यामुळे श्रवणशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे लसीकरण खूप महत्वाचे असल्याचे कान-नाक-घसा तज्ज्ञ डाॅ. अविनाश वाचासुंदर यांनी सांगितले.
रुग्णसंख्या वाढल्याचे निरीक्षण
अॅडिनो व्हायरसमुळे शहरात सध्या सर्दी, ताप, खोकला, घसा दुखणे, डोळे लाल होणे, अंग दुखणे यासह अन्य तक्रारी मुलांमध्ये दिसून येत आहे. दररोजच्या रुग्णसंख्येपेक्षा 30 ते 40 टक्क्यांनी रुग्णसंख्या वाढली आहे. थंडीच्या दिवसांमध्ये लहान मुले या संसर्गामुळे आजारी पडतात. त्यामुळे ताप, घसा दुखणे आणि डोळे लाल होणे ही लक्षणे दिसल्यास तत्काळ डाॅक्टरांच्या सल्याने उपचार घ्यावे, असा सल्ला सूर्या मदर अॅन्ड चाइल्ड हाॅस्पिरुटलचे सचिन शहा यांनी दिला.