नवी दिल्ली – भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर पोहचवण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या महेंद्र सिंह धोनी उर्फ कॅप्टन कुलने १५ ऑगस्टरोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या निवृत्तीचा निर्णय त्याने फार गाजावाजा न करता सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत जाहीर केला होता. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला एक पत्र लिहलं आहे.
पंतप्रधानांचं पत्र धोनीने आपल्या सोशल मीडियावर शेअर करत, “कलाकार, सैनिक आणि खेळाडू यांना अपेक्षा असते ती केवळ कौतुकाची. त्यांनी केलेल्या कामाची आणि बलिदानाची नोंद घेतली जावी आणि त्यांचे सर्वांनी कौतुक करावे असं त्यांना वाटतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्ही केलेल्या कौतुकाबद्दल धन्यवाद,” असा संदेश लिहला आहे.
पंतप्रधानांचे धोनीला पत्र
आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोनीला एक पत्र लिहीत त्याचा गौरव केला आहे, ते लिहतात, “१५ ऑगस्ट रोजी तू तुझ्या ट्रेडमार्क स्टाइलमध्ये एक लहान व्हिडिओ शेअर केला आणि त्यावरुन देशभरामध्ये चर्चा सुरु झाली. १३० कोटी भारतीय निराश झाले मात्र त्याचवेळी ते तुझे आभारीही आहेत. मागील दीड दशकामध्ये तू भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाबद्दल ते सर्व तुझे आभारी आहेत,”
“तुझ्या क्रिकेटमधील करिअरकडे आकडेवारीच्या दृष्टीकोनातूनही पाहता येईल. तू भारतीय क्रिकेटला लाभलेल्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहेस. जागतिक पातळीवर भारतीय क्रिकेटला शुक्रवार पोहचवण्यामध्ये तुझं अतुलनीय योगदान आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये तुझं नाव कायमच एक यशस्वी फलंदाज, यशस्वी कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक म्हणून घेतलं जाईल.”
या पत्रामध्ये पंतप्रधानांनी २०११ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या आठवणी जाग्या करताना, “कठीण प्रसंगी संघाला तारण्यात आणि तुझ्या स्पेशल स्टाईलमध्ये मॅच संपवण्यात तू माहीर होतास. येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी तुझी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील खेळी संस्मरणीय राहील.”
An Artist,Soldier and Sportsperson what they crave for is appreciation, that their hard work and sacrifice is getting noticed and appreciated by everyone.thanks PM @narendramodi for your appreciation and good wishes. pic.twitter.com/T0naCT7mO7
— Mahendra Singh Dhoni (@msdhoni) August 20, 2020