हॉटेल राजवाडा प्रकरण : सुपारी देऊन घडवून आणला हल्ला, सुपारी देणाऱ्या चौघांची नावे उघड

पिंपरी – राजवाडा हॉटेलचे मालक प्रविण ढमे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोन सराईत हल्लेखोरांना पकडण्यात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपींच्या तपासात ढमे यांची सुपारी देऊन हल्ला घडवून आणल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. दोन्ही आरोपीकडून ढमे यांना मारण्यासाठी पैसे देणाऱ्या चौघांची नावे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वी प्रविण ढमे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय लक्ष्मण शिंदे (वय- 21, रा. वाघेश्‍वरनगर झोपडपट्टी, वाघोली, पुणे) व देविदास उर्फ अमोल नागनाथ लष्करे (वय- 23, रा. सिध्दार्थ नगर, वाघोली, पुणे) याला अटक केली आहे. ताब्यात घेताच पोलिसांनी त्यांच्याकडे गुन्ह्यासंबंधी विचारपूस केली असता त्यांना या गुन्ह्याची कबुली तर दिलीच परंतु हल्ला करण्यासाठी आपल्याला चार लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही सांगितले.

अमोल गलफडे, विजय शिंदे, अजित साळवी, सचिन साठे यांच्या सांगण्यावरुन गुन्हा केला असल्याचे आरोपींकडून सांगण्यात आले. या बदल्यात आपल्याला 4 लाख रुपये देण्यात येणार असल्याचे त्यांनी कबूल केले आहे. पोलिसांनी पकडलेल्या आरोपीकडून इतर चार नावे उघड झाल्याने आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. अधिक तपासासाठी गुन्हे शाखेने या दोन्ही आरोपींना देहूरोड पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्‍त आर.के पद्मनाभमन, अप्पर पोलीस आयुक्‍त मकरंद रानडे, सहाय्यक पोलीस आयुक्‍त सतीश पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 2 चे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल कदम, नितीन बहिरट, लक्ष्मण आढारी, मयूर वाडकर, प्रविण दळे, किरण आरुटे, तुषार शेटे, हजरत पठाण, संजय गवारे, संदीप ठाकरे आदींनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.