पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने शहरात करोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. आज (दि. 14) शहरातील 62 केंद्रांवर कोविशिल्ड लसीची मात्रा देण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर 9 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे.
मंगळवारी (दि. 14) शहरातील 18 ते 44 वर्ष व 45 वर्षांवरील नागरिकांना 62 केंद्रावर कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. त्यापैकी 9 केंद्रावर 500 डोस उपलब्ध आहेत. तर उर्वरित सर्व केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध आहेत. प्रत्येक लसीकरण केंद्रावर 5 लाभार्थी हे ऑनलाइन स्लॉट बुकिंग केलेले तर 20 किऑस्क टोकन घेतलेल्या लाभार्थ्यांना लस देण्यात येणार आहे. तसेच उर्वरित नागरिकांना ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍपनुसार लस दिली जाणार आहे. या केंद्रावर कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात येणार आहे.
तसेच इतर नऊ केंद्रावर कोव्हॅक्सिन लस दिली जाणार आहे. या केंद्रांवर प्रत्येकी 300 डोस उपलब्ध आहेत. सर्व केंद्रावर सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत लसीकरण केले जाणार आहे. कोविन ऍपवर नोंदणी करण्यासाठी मंगळवारी (दि. 14) सकाळी 8 वाजता स्लॉट बुकींगसाठी ओपन होतील.
महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर दिव्यांग व तृतीयपंथी लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. तसेच महापालिकेच्या आठ लसीकरण केंद्रावर गरोदर महिलांसाठी काही डोस राखीव ठेवण्यात येतील. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.