पुणे – “इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’तर्फे (आयसीएआय) घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट अर्थात सीए अंतिम परीक्षेचा आणि “सीए फाउंडेशन कोर्स’चा निकाल सोमवारी जाहीर करण्यात आला. यात सीएच्या दोन्ही अभ्याक्रमांच्या निकालात मुलीच अव्वल ठरल्या.
सीए परीक्षेची परीक्षा जुलै 2021 मध्ये घेण्यात आली होती. नवीन अभ्यासक्रमाच्या ग्रुप-1 मधून 9,986 विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्णाची टक्केवारी 20.23 इतकी आहे. तर ग्रुप दोनमधून 7 हजार 328 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्याची टक्केवारी 17.36 आहे. तर दोन्ही ग्रुपमधून 2 हजार 870 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दोन्ही ग्रुपमध्ये 11.97 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवीन अभ्यासक्रमात देशातून मध्यप्रदेशच्या मोरेना येथील नंदीनी अगरवाल प्रथम, इंदौरची साक्षी एअरान द्वितीय आणि बंगळुरूची साक्षी बग्रेचा हिने तृतीय क्रमांक पटकावला. सीए जुन्या अभ्यासक्रमाचा ग्रुप एकचा 10.74 टक्के इतका निकाल लागला असून, यात 1,348 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप दोनचा निकाल 12.87 टक्के लागला असून, यात
2,194 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दोन्ही ग्रुपचा निकाल 1.57 टक्के लागला असून, यात 62 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जुन्या अभ्यासक्रमात मंगळुरूची रूथ डिसिल्वा आणि केरळची मलाविका कृष्णन हिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
पुण्यातील टॉपर्स
“आयसीएआय’च्या पुणे विभागाने पुण्यातील टॉपरची नावे जाहीर केली आहे. त्यात रोनक तुलशन हा प्रथम क्रमांक, मृण्मयी अवचटने द्वितीय, मनाली पावळे हिने तृतीय, चौथे स्थान शंतनु दरक आणि अक्षय दर्डा याने पाचवे स्थान पटकाविले आहे.
फाउंडेशनचा निकाल 26 टक्के
सीए फाउंडेशनमध्ये परीक्षेसाठी 71,967 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 19, 159 विद्यार्थी उत्तीर्ण ठरले आहेत. एकूण निकाल 26.62 टक्के लागला आहे. मुलांची उत्तीर्णाची टक्केवारी 26.08, तर मुलींची टक्केवारी 27.26 इतकी आहे. देशात फाउंडेशनची परीक्षा 694 केंद्रावर घेण्यात आली होती.