“वाकडे’ करण्याची भाषा; आस्तनितील निखाऱ्यांना आता क्षमा नाही
– संदीप घिसे
पिंपरी – महापालिकेतील भाजपाच्या सत्तेचा फायदा घेत जे मोठे झाले, त्या आस्तनितील निखाऱ्यांना आता क्षमा नाही, यापुढे जशास तसे उत्तर देण्याची भाषा करतानाच “वाकडे करण्या’सारख्या शब्दांचा प्रहार करत भाजपातील एका पदाधिकाऱ्याने स्वकीयांवरच आरोपांचा भडीमार केला. शहर भाजपच्या या अंतर्गत धुळवडीने सोशल मीडियावर धूम उडवून दिली आहे. या प्रकारामुळे भाजपामध्ये अंतर्गत लाथाळ्यांचा उद्रेक झाल्याचे समोर आले आहे, तसेच सत्तेचा गैरवापर करत काहीजण “गब्बर’ झाल्याची कबुलीच दिल्याने भ्रष्टाचार सुरू असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून अंतर्गत मात्र छुप्या पद्धतीने लाथाळ्या सुरू असल्याचे समोर आले होते. मात्र त्याचा जाहीर उच्चार कोणी केला नव्हता. मात्र पक्षाच्या शहर पातळीवरील एका पदाधिकाऱ्याने सोशल मीडियावर निष्ठावंत आणि आयारामांच्या वादाला तोंड फोडले आहे. या पदाधिकाऱ्याने स्वपक्षातील एका नगरसेवकावर सडकून टीका करताना पक्षांतर्गत वादाला जाहीर स्वरुप दिले आहे.
सोशल मीडियावर टीका करताना या पदाधिकाऱ्याने म्हटले आहे की, शहर भाजपामध्ये आस्तनितील निखारे आहेत. त्यांना आता क्षमा नाही. गद्दारांना माफी नाही, असा इशारा दिला आहे. भाजप प्रवेश 2015 ला, भाजप पदाधिकारी 2016 ला, भाजप नगरसेवक 2017 ला, महापालिकेतील सर्वात मोठे लाभाचे पद 2017 ला, तर 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधात बंडखोरी, असे सूचक इशारेही दिले आहेत.
एवढे उरावर घेऊनसुद्धा आजही भाजपमध्ये सुरक्षित, आणि तरीही भाजपच वाईट? आता काय भाजपने यांच्या घरी पाणी भरायचे का? कोण आहात तुम्ही? वय काय तुमचे भाजप मधील? का सहन करायचे? आम्ही भाजप कार्यकर्त्यांनी तुमचे हे स्वार्थी उद्योग पक्ष म्हणून स्वीकारले. पण आता नाही, आता जो स्वतःला फक्त लाभासाठी भाजपवाला म्हणवतो आणि भाजप विरोधात काम करतो, त्याला आम्ही सोडणार नाही. त्याला जशास तसे उत्तर देणार. भले पक्षाने आमच्यावर कार्यवाही केली तरी बेहत्तर, अशा शब्दात सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रहार केल्याने भाजपातील अंतर्गत दुफळी दिवसेंदिवस वाढत असल्याचे तसेच महापालिकेत भ्रष्टाचार करून त्यांचेच नगरसेवक मोठे होत असल्याचीही कबुली दिल्याने खळबळ उडाली आहे.
बोंबा का मारता?
आमच्या भाजपच्या जिवावर मोठे झालेल्यांनो याद राखा, ज्या गतीने आमच्या भाजपने तुम्हाला मोठे केले, तो भाजप गद्दारांना त्यांची जागा पण त्याच गतीने दाखवतो. गद्दारांना माफी नाही, आता हीच नीती आमची असणार. पक्षाच्या नावावर, चिन्हावर निवडून यायचे, प्रचंड मोठमोठे लाभ घ्यायचे, आणि नंतर मग त्याच पक्षाच्या आणि पक्षनेत्यांच्या नावाने जाहीररित्या बोंबा मारायच्या, अशी डबल ढोलकी नीती, नाही सहन करणार, कदापि नाही सहन करणार. आम्ही कट्टर आणि कट्टर भाजपवाले आहोत, असा इशाराही या पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्याने हा वाद कोणत्या दिशेला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.