पिंपरी -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील सापांसाठी खाद्य म्हणून पांढरे उंदीर खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. 163 रुपयांना एक याप्रमाणे 7 हजार 200 उंदीर खरेदी करण्यासाठी महापालिका 11 लाख 73 हजार 600 रुपयांचा खर्च करणार आहे.
स्थायी समितीच्या मंगळवारी (दि.29) झालेल्या सभेत या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह अध्यक्षस्थानी होते. संभाजीनगर येथे महापालिकेचे संत निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालय आहे. पुर्वी ते सर्पोद्यान म्हणून ओळखले जात. सध्या या प्राणिसंग्रहालयाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. सर्पोद्यानात आजमितीला विविध प्रजातींचे 180 साप आहेत. सापाचा मुख्य आहार उभयचर आणि मासे असून ते बेडूक, टॅडपोल आणि टॉड्स खातात. या व्यतिरिक्त सरडे,
त्यांची अंडी, उंदीर, कीटक, लहान पक्षी, त्यांची अंडी आणि पिल्ले, वटवाघुळ, लहान खार आदी सापांचे प्रमुख खाद्य आहे. महापालिकेच्या पशूवैद्यकीय विभागातर्फे सापांच्या खाद्यांसाठी पांढरे उंदीर खरेदी केले जातात. दोन वर्षाच्या कार्यकालासाठी 11 लाख 88 रुपयांची निविदा महापालिकेने नुकतीच प्रसिद्ध केली. तीन ठेकेदारांनी त्यात सहभाग घेतला. त्या पैकी सॅम एंटरप्रायजेस या ठेकेदाराने 165 रुपये प्रती उंदीरऐवजी 163 रुपयांत उंदीर पुरविण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार, त्यांच्याकडून 7 हजार 200 उंदीर खरेदी केले जाणार आहे. या पुरवठ्यासाठी ठेकेदाराला 11 लाख 73 हजार 600 रुपये अदा करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
चांगल्या दर्जाचे उंदीर न दिल्यास पाचशे रुपये दंड
सांपासाठी खाद्य पुरवठा करणाऱ्या सॅम एंटरप्रायजेस या संस्थेने चांगल्या दर्जाचे पांढरे उंदीर न दिल्यास पाचशे रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. पांढऱ्या उंदरांमुळे विषबाधा झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पुरवठादाराची असणार आहे.