मॉस्को – युक्रेनने जर ब्रिटनने दिलेल्या शस्त्रांनी आमच्यावर हल्ला केला तर आम्ही त्याचे प्रत्युत्तर म्हणून ब्रिटनवर हल्ला करू असा थेट इशारा रशियाकडून देण्यात आला आहे. रशियाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोवा यांनी हा इशारा दिला आहे. युक्रेनला दीर्घ पल्ल्याच्या अंतरावर मारा करू शकतील अशी शस्त्रे देण्याचा विचार पश्चिमेकडील राष्ट्रांकडून सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर रशियाने ब्रिटनला हा सावधानतेचा इशारा दिला आहे.
रशियाकडून अशी आगळीक केली जाऊ शकते ही शक्यता गृहीत धरून अमेरिकेने यात फारशी सक्रियता आतापर्यंत दाखवलेली नाही. तथापि, ब्रिटनसहीत अन्य युरोपीय देश लांब अंतरावर मारा करू शकतील अशी शस्त्रे युक्रेनला दिली जाण्याची वकिली करताना दिसत आहेत. त्यांनी जर अशी शस्त्रे दिली तर केवळ युक्रेनच नाही तर युक्रेनच्या बाहेर जी कोणती ब्रिटनची ठिकाणे आहेत त्यांना लक्ष्य केले जाईल असा थेट इशारा रशियाने दिला.
ब्रिटनने दिलेल्या शस्त्रांचा वापर रशियाच्या विरोधात करण्याचा युक्रेनला अधिकार आहे असे ब्रिटनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डेव्हिड कॅमेरून यांनी अलिकडेच म्हटले होते. त्याला रशियाकडून हे उत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, अमेरिकनांची रशियात असलेली संपत्ती आणि सिक्युरिटी बॉंड जप्त करण्याबाबतच्या आदेशांवर रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी स्वाक्षरी केली आहे. या आदेशामुळे रशियन संस्थांना त्यांच्या देशात अमेरिकेची जी काही मालमत्ता आहे ती जप्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे.
अमेरिकेने रशियावर लादलेल्या निर्बंधांच्या अंतर्गत रशियाची जी संपत्ती जप्त केली आहे ती मदत म्हणून युक्रेनला देण्याची योजना तयार केली आहे. त्याला उत्तर म्हणून रशियाकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. युरोपीयन संघाकडूनही रशियाच्या मालमत्ता जप्तीचे असेच पाऊल उचलले जाण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या पाश्र्वभूमीवर अमेरिकेबाबतचा आदेश पुतीन यांच्याकडून काढण्यात आला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही निर्णयाचे विनाशकारी परिणाम होतील असा इशारा जाखारोवा यांनी युरोपीय संघाला दिला आहे. २०२२ मध्ये युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियाची जवळपास ३०० अब्ज डॉलरची संपत्ती जप्त केली आहे.