लोणावळा – मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील खोपोली हद्दीत फूड मॉल जवळील तीव्र उतारावर एका ट्रेलरची चार वाहनांना धडक बसली. या अपघातात दोन ट्रक मार्गालगतच्या दरीत सुमारे शंभर फूट उंचीवरून खाली पडले. या विचित्र अपघातात ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला तर इतर दोनजण जखमी झाले आहेत. अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. गेल्या काही दिवसांपासून मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाताचे सत्र अद्याप सुरूच आहे.
हा अपघात बुधवारी पहाटे चारच्या सुमारास झाला आहे. मागील काही दिवसांपासून मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटातील आडोशी बोगदा ते फूड मॉल दरम्यान अपघातांचे सत्र अद्याप सुरूच आहे. अजित जाधव (वय 32, रा. सांगली) असे अपघातात मृत्यू झालेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. या अपघातात भांड्यांची आणि कांद्याची वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि कंटेनरचा समावेश आहे.
दस्तुरी (बोरघाट) महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रेलरचा (क्रमांक एमएच 46, बीएम 9397) टायर फुटल्याने ट्रेलर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रेलरची पुढे जाणाऱ्या टेम्पोला (क्रमांक एमएच 13, डीक्यू 3101) पहिली धडक देत नंतर डाव्या बाजूने जाणाऱ्या ट्रकला (क्रमांक केए 3-9, ए 0344) धडक दिली. त्यानंतर पुढे आणखी एका ट्रकला (क्रमांक केए 51, एजे 5978) धडक दिली. या विचित्र अपघातात एका ट्रकची केबीनची सुटून सदर ट्रक आणि दुसरा एक ट्रक मार्गालगच्या दरीत कोसळला. यात दोनजण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्ग व खोपोली पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक व आयआरबीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. ट्रकच्या केबीनमध्ये अडकलेल्या एका जखमी चालकाला बाहेर काढले. उपचारासाठी पनवेल येथील हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने मार्गावरील अपघातग्रस्त वाहने बाजूला करून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत केली. या घटनेचा पुढील तपास खोपोली पोलीस
करीत आहेत.
आठवड्यातील तिसरा अपघात
मुंबई – पुणे एक्स्प्रेस वेवर खंडाळा घाटात होताहेत वारंवार अपघात होत असून आठवड्यातील तिसरा अपघात आहे. यात जखमी व मृतांचा संख्या वाढत आहे. तसेच वाहनांचे नुकसानही होत आहे. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.
अपघाताची प्रमुख कारणे…
तीव्र उतार आण्रि वळणे कारणीभूत
उतारामुळे वाहनांवरील नियंत्रण सुटणे
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन