मुंबई – शिवसेनेच्या शिंदे गटाचे नेते गजानन किर्तीकर यांच्या भूमिकेवर शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता आहे. त्यातून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात असताना किर्तीकर यांचेही समर्थक पुढे सरसावले असून त्यांनी अशा प्रकारची कोणतीही कारवाई झाली तर आम्हालाही आमच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल, असा इशारा किर्तीकर समर्थकांनी केल्याने शिंदे गटातील या विषयावरचा वाद विकोपाला गेला असल्याचे चित्र आहे.
किर्तीकर यांनी अलिकडेच केलेल्या काही विधानांमुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिंदे गटाचे शिशीर शिंदे यांनी केली आहे.गजानन किर्तीकर यांनी लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे उमेदवार व त्यांचे पुत्र अमोल किर्तीकर यांना मदत केल्याचा आरोप आहे, त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी करणारे लेखी पत्र शिशिर शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
पण त्यांच्या या मागणीला माजी खासदार आनंदराव आडसूळ यांनी विरोध दर्शवला आहे. किर्तीकर यांच्यावर कारवाई केली तर आम्हालाही आमच्या भूमिकेचा फेरविचार करावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे. किर्तीकर यांनी आपल्या मुलाला लोकसभा निवडणुकीत मदत केली असा आरोप त्यांच्यावर केला जात आहे, पण एकाच घरात राहणाऱ्या मुलाला मदत केली असेल तर त्या विषयी फार वावगे वाटून घेण्याचे कारण नाही, आणि त्यांनी तशी मदत केली आहे असेही ठामपणे सांगता येत नाही. पण त्यांनी मुलाला मदत केली असेल असे क्षणभर गृहीत धरले तर त्यात चुकीचे काही आहे असे म्हणता येणार नाही.
उलट त्यांनी आपल्यामुलाला निवडणुकीत मदत करता आली नाही अशी खंत गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे हा विषय फार ताणताकामा नये. आणि त्यांच्यावर कारवाई करण्यची मागणी करणाऱ्या शिशिर शिंदे यांची पात्रता काय असा सवालही आडसूळ यांनी विचारला आहे. शिशिर शिंदे हे चार पक्ष फिरून शिवसेनेत आले आहेत असे त्यांनी म्हटले आहे.