पिंपरी – कुदळवाडी परिसरातील गोवरची लागण झालेल्या 3 मुली आणि 2 मुलांची प्रकृती व्यवस्थित आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू असून शहरात गोवरचे रुग्ण सापडले असले तरी, गोवरचा उद्रेक नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये, मात्र खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी केले. गोवरची लागण झाल्यास बालकांना उपचारासाठी पालिकेच्या पाच रूग्णालयात 30 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच गरज पडल्यास बेडची संख्याही वाढवता येईल, असेही त्यांनी सांगितले.
चिखली-कुदळवाडी येथील 5 बालकांना गोवरची लागण झाल्याचे मंगळवारी (दि.29) निष्पन्न झाले. त्यापार्श्वभूमीर महापालिका करत असलेल्या उपाय योजनांची माहिती आयुक्त सिंह यांनी बुधवार (दि.30) रोजी पत्रकारांना दिली. आयुक्त सिंह म्हणाले, कुदळवाडी परिसर हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे कुदळवाडी भागातील 9 महिने ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना गोवरचा बूस्टर डोस दिला जात आहे. आत्तापर्यंत 320 बालकांना बूस्टर डोस देण्यात आला. लशीचा तुटवडा नाही. ज्या बालकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना लस देण्यात येत आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे.
गोवरची लागण झालेल्या 5 बालकांची प्रकृती स्थिर आहे. कोणी गंभीर नाही. गोवरची लागण झाल्यानंतर रस, भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. लसीकरण करुन घेतल्यास कोणताही धोका नाही. बालवाडी, शाळांनाही खबरदारी घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. गोवरची लक्षणे असल्यास तत्काळ डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देण्यास सांगण्यात आले आहे. नवीन आकुर्डी रुग्णालयात 10, जिजामाता 10, थेरगाव 5 , भोसरी रुग्णालयात 5 आणि वायसीएम रुग्णालयात 8 आयसीयू बेड गोवर बाधितांसाठी राखीव ठेवले आहेत. कुदळवाडीशिवाय दुसऱ्या कोणत्याही भागात गोवरचे रुग्ण नाहीत. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये पण खबरदारी घ्यावे असे आवाहन आयुक्त सिंह यांनी केले.
98 हजार 743 घरांचे सर्व्हेक्षण
गोवरच्या पार्श्वभूमीवर शहरातील 98 हजार 743 घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. 3 लाख 69 हजार 336 नागरिकांचे सर्व्हेक्षण केले. 5 वर्षाखालील सर्व्हेक्षण 21 हजार 200 बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. तर, 10 हजार 822 बालकांना व्हिटॅमीन ए ची मात्रा देण्यात आली आहे. शिवाय शहरातील 1 हजार 893 बालकांना गोवर रुबेला लसीचा पहिला व दुसरा डोस देण्यात आला असल्याचे डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.