पिंपरी – शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम अंतर्गत सात अत्याधुनिक वाहनांचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, उल्हास जगताप, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.
15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार महापालिकेस हवेची गुणवत्ता सुधारणे, संरक्षण, पुरवठा आणि पाण्याचे व्यवस्थापन आणि कार्यक्षम घनकचरा व्यवस्थापन उपाय यासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. पालिकेच्या राष्ट्रीय शुद्ध हवा अभियान अंतर्गत शहर कार्य आराखड्यास (सिटी ऍक्शन प्लॅन) केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून मंजुरी प्राप्त झालेली आहे. त्यानुसार शहरातील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी शहरातील रस्त्यांची रोड वॉशर सिस्टीम असलेल्या 2 वाहनांद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे शहरातील रस्त्यांवरील धुलीकणांचे प्रमाण कमी होणार आहे. मुख्य चौकांचे हवा प्रदूषण कमी करण्यासाठी मुव्हेबल फॉग कॅनन डस्ट सप्रेशन प्रणाली 5 वाहनांवर बसविण्यात आली आहे. ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यास यंत्रणा बसविलेच्या परिसरातील पीएम-10, पीएम-2.5, एसओएक्स, एनओएक्स इत्यादी वायु प्रदुषकांची पातळी मर्यादित राहणार आहे, अशी माहिती सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी दिली.