पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने यंदाच्या वर्षात आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा आणि सेवा सक्षमीकरणावर भर दिला जाणार आहे. आरोग्यावर 372 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये रूग्णालयांची उभारणी आणि सोशल इम्पॅक्ट बॉन्डच्या माध्यमातून सेवा सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. तसेच पीपीपी तत्वावर कॅन्सर रूग्णालय उभारण्यात येणार आहे.
मोशी येथे नव्याने 750 बेडसचे नविन रुग्णालय प्रस्तावित आहे. तसेच वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे. मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तालेरा रुग्णालयाशेजारी नविन रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असुन मल्टिस्पेशालिटी सेवा सुरु करण्यात येणार आहेत.
बचत गटासाठी नवी दिशा स्पर्धा
नवी दिशा-महिला गटांना स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यकतेनुसार निधी दिला जाईल आणि नवी दिशा अंतर्गत सामुदायिक शौचालय सुरळीतपणे चालवण्यासाठी आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यात येतील. नवीन गटांना नवी दिशा उपक्रमात सहभागी होण्यासाठी नवी दिशा स्पर्धा आयोजित करून विजेत्यांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
नदी पुनरुज्जीवन प्रकल्प
शहरातून वाहणाऱ्या नदी पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत मुळा, पवना व इंद्रायणी या नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी कर्ज रोख्याद्वारे निधी उभारण्यास शासनाने मंजूरी दिली असून सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये कामे हाती घेण्यात येणार आहेत. मुळा नदी: वाकड पूल ते सांगवी या 8.80 किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्याचे काम एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात येणार आहे.
ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोतांचा विचार
ऊर्जेच्या पर्यायी स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मोशीमध्ये सातशे टीपीडी क्षमतेचा 14 एमव्ही विज निर्मितीचा डब्लूटीई प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. मे 2023 पासून प्रकल्प कार्यान्वियीत करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
नदी पुनरूज्जीवनासाठी कर्जरोखे
पर्यावरण अभियांत्रिकी, जलनि:सारण व आरोग्य सुविधांवर दिला आहे. गणेश नगर, बर्ड व्हॅली, भोसरी आणि चिखली येथील जलस्त्रोत जपणूक, मुळा, पवना व इंद्रायणी या नद्यांच्या पुनरूज्जीवनासाठी कर्ज रोख्याद्वारे निधी उभारण्यास मान्यता मिळाली आहे. त्यानुसार नदीसुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मोशीतील कचऱ्यापासून विज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे नियोजन आहे. महापालिकेच्या अंदाजपत्रकात आरोग्य जलनिस्सारण आणि पर्यावर कामासाठी 75 कोटींची तरतूद केली आहे. झोपडपट्टी स्वच्छ करण्यासाठी शून्य कचरा झोपडपट्टी मॉडेल सुरू केले आहे. ज्यामध्ये महिला गट घरोघरी कचरा संकलन करण्यात येत आहे. शून्य कचरा झोपडपट्टी उपक्रमाचा उद्देश झोपडपट्टीतील प्रत्येक घरापर्यंत पोहोचणे आणि महिला गटांना उपजीविकेची संधी उपलब्ध करून देणे आहे. महिला गटांना प्रोत्साहन देण्यासाठी पालिकेमार्फत त्यांना दरमहा मोबदला देण्यात येणार आहे. यांत्रिक मॅन्युअल कचरा कंपोस्टिंग मशीन उपलब्ध करण्यात येईल.