पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पात पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्यावर भर दिला आहे. तसेच, भाजपाच्या सत्ताकाळात प्रस्तावित केलेल्या प्रकल्पांना गती दिली आहे. खऱ्या अर्थाने पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी दिली. तसेच अर्थसंकल्पात सर्वस्तरातील नागरिकांचा विचार करण्यात आला आहे. त्याबद्दल आमदार लांडगे यांनी समाधान व्यक्त केले आहे.
आमदार लांडगे म्हणाले की, राज्य सरकारच्या काळात प्रशासक राजवट असतानाही भाजपा सत्ताकाळातील कामांना चालना मिळाली. आयुक्त शेखर सिंह आणि प्रशासनाने सामान्य पिंपरी-चिंचवडकर केंद्रबिंदू मानून अर्थसंकल्प सादर केला आहे.
या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रस्ते, पर्यावरण, शिक्षण, क्रीडा आणि महिला सक्षमीकरणासह प्रस्तावित प्रकल्पांना पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
मोशी येथे साकारण्यात येणाऱ्या पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या 750 बेडच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. यासह समाविष्ट गावांतील विविध प्रकल्पांना चालना मिळाली आहे. नदी सुधार प्रकल्पामुळे “नमामि इंद्रायणी’ च्या कामाला गती मिळणार आहे.