मुंबई – लोकसभा निवडणुकींनंतर विधान परिषदेच्या चार जागांसाठी नव्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला. यानंतर सर्वात प्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ( maharashtra vidhan parishad election 2024)
मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच ठाकरे गटाने कसलीही वाट न पाहता आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पण महत्त्वाची बाब म्हणजे विधान परिषदेवर आमदार असलेल्या अनिल परब यांना पुन्हा विधान परिषदेवर पाठवण्यासाठी खेळी केली आहे. अनिल परब यांचा 27 जुलै 2024 रोजी विधानपरिषदेवरील कार्यकाळ संपणार आहे. पण ठाकरे गटाचे विधानसभेतील संख्याबळ पाहता परब यांना विधानपरिषदेवर पुन्हा निवडून जाणे हे आव्हानात्मक ठरु शकते.
ज्यामुळे ठाकरे गटाची बाजू परिषदेत ठामपणे मांडणाऱ्या अनिल परब यांना परिषदेतच ठेवण्यासाठी आता पदवीधर मतदारसंघाच्या मार्गाने परिषदेवर पाठवण्याची तयारी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पण यामुळे आता परिषदेवर जाण्याची ठाकरेंच्या युवासेनेचे नेते वरुण सरदेसाई यांच्याकडील संधी मात्र हुकली आहे. कारण अनिल परब यांच्याबाबतीत कोणतीही रिस्क न घेता त्यांनी सेफ गेम खेळला असल्याचे सध्या तरी पाहायला मिळत आहे.
अनिल परब यांच्यासोबतच ठाकरे गटाने ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तर, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा दांडगा अनुभव असलेल्या अभ्यकरांना ठाकरे गटाने विधानपरिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. पण अभ्यकरांना संधी दिल्याने विलास पोतनीस यांचा पुन्हा परिषदेवर जाण्याचा पत्ता मात्र कट झाला आहे.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम
31 मे 7 जून पर्यंत अर्ज भरणार
10 जून रोजी अर्जाची छाननी
12 जूनपर्यंत अर्ज माघारी घेता येणार
26 जून रोजी मतदान होणार
1 जुलै रोजी होणार मतमोजणी
यांचा कार्यकाळ संपणार –
मुंबई पदवीधर मतदार संघातून विलास पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.