प्रसिद्धीसाठी श्रीरंग बारणे यांचा स्टंट – मोरेश्‍वर भोंडवे

सुळेंबाबत केलेल्या विधानाचा वापर स्वत:साठी

पिंपरी – आज मतदान झाले असून मतदान पूर्ण होण्यापूर्वीच अजित पवारांना सन्यास घेण्याचे आवाहन करणारे श्रीरंग बारणे यांचे विधान हे निव्वळ प्रसिद्धीचा स्टंट असून येत्या 23 मे रोजी बारणेंना जनताच त्यांची जागा दाखवून देईल, असे प्रतिपादन नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना केले.

सोमवारी मतदान केल्यानंतर महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा पराभव निश्‍चित असून, अजित पवार यांनी सन्यास घ्यावा, असे वक्‍तव्य केले होते. प्रत्यक्षात मात्र मावळ मतदार संघाबाबत आणि पार्थ पवार यांच्या जिंकण्या-हारण्याबाबत अजित पवार यांनी कोणेतेही वक्‍तव्य केलेले नव्हते. अजित पवार यांनी सन्यास घेईन, असे वक्‍तव्य बारामती लोकसभा मतदार संघाबाबत केली होती. सुप्रिया सुळे यांचा विजय न झाल्यास आपण राजकीय सन्यास घेऊ, असे वक्तव्य केले होते. बारामती येथे केलेल्या या वक्‍तव्यावर आज बारणे यांनी मतदानानंतर अजित पवारांना उद्देशून विधान केले. पार्थ यांच्या पराभवानंतर आपण सन्यास घेऊ, असा दावा अजित पवारांनी केल्याचे सांगत अजित पवार यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आवाहन बारणे यांनी आज केले.

बारणे यांच्या या वक्‍तव्याचा खरपूस समाचार राष्ट्रवादीचे नगरसेवक मोरेश्‍वर भोंडवे यांनी घेतला. मतदानाची वेळ संपल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विजयावरून केलेल्या वक्‍त्वव्याचा वापर बारणे यांनी स्वत:च्या प्रसिद्धीसाठी केला आहे. अजून निकाल लागणे बाकी आहे. येत्या 23 तारखेला कोणाला संन्यास घ्यावा लागणार हे त्यांना आतापासूनच दिसू लागल्याने केवळ चर्चेत राहण्यासाठी बारणे पवारांवर चिखलफेक करीत आहेत. पार्थ यांना मिळालेल्या प्रतिसादामुळे बारणे अस्वस्थ झाले आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजय निश्‍चित असून बारणेंच्या थेरगावातही राष्ट्रवादीला मोठे मताधिक्‍य मिळाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.