राहुल आवारेची ‘अर्जुन’साठी शिफारस

कुस्ती महासंघाकडून इतर पुरस्कारांसाठीही खेळाडूंची शिफारस

नवी दिल्ली  -कॉमनवेल्थ स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारा पुण्याचा कुस्तीपटू राहुल आवारे याची क्रीडापटूंसाठी मानाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. ही शिफारस भारतीय कुस्ती महासंघाकडून सोमवारी करण्यात आली आहे. याशिवाय हरप्रीत सिंग, दिव्या काकरान आणि पूजा धांडा यांच्या नावांचीही शिफारस करण्यात आली आहे.

भारतीय क्रीडापटूंसाठी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी गतवर्षी आशियाई स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी विनेश फोगट आणि आशियाई चॅम्पियन बजरंग पुनिया या दोघांची शिफारस करण्यात आली आहे. चीन येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई चॅम्पियशनशिपमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथमस्थानी असलेल्या बजरंग पुनिया याने 65 किलो वजनी गटातून विजेतेपद पटकाविले होते. तर विनेशने 53 किलो वजनी गटातून कांस्यपदक जिंकले होते.

याशिवाय, द्रोणाचार्य पुरस्कारासाठी वीरेंद्र कुमार, सुजीत मान, नरेंद्र कुमार आणि विक्रम कुमार यांची शिफारस करण्यात आली आहे. तर भीम सिंग आणि जय प्रकाश यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
दरम्यान, 2018 साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार नाकारला गेल्याने संतप्त झालेला कुस्तीपटू बजरंग पुनिया याने क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त केली होती. पण यावेळी त्याची शिफारस करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.