देहूरोड – देहूरोड येथील ऐतिहासिक धम्मभूमीच्या 68 वा वर्धापन दिनानिमित्त विविध धम्मजागृती अभियान, महाबुद्धवंदना, पंचशील ध्वजारोहण, धम्मदिक्षा, धम्मप्रवचन, विविध पुरस्कार वितरण, विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. भगवान बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्तूपाचे दर्शनार्थ लाखो भीम बांधवांच्या बुद्ध विहाराजवळ जनसागर लोटला होता.
भीम बांधवांच्या सेवार्थ विविध पक्ष, सामाजिक संस्था, मंडळ, प्रतिष्ठाणने पोहे, चहा, पाणी, अल्पोपहारासह मसाला भात, पुरीभाजी, अन्नदान केले. फोटो मूर्ती, खेळणी, पुस्तके कॅलेंडर,विविध साहित्य विक्रेत्यांच्या दुकानांनी परिसराला जत्रेची स्वरूप प्राप्त झाले होते. पोलिसांच्या कडक बंदोबस्ताने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहारात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 68 वर्षांपूर्वी (25 डिसेंबर 1954 रोजी) ब्रम्हदेशातील रंगून येथून आणलेल्या भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना स्वहस्ते केली होती.या ऐतिहासिक घटनेला रविवारी ( दि.25 ) 68 वर्ष पूर्ण होत असल्याने बांधवांनी मोठ्या संख्येने ऐतिहासिक धम्मंभूमीतील बुद्धमूर्ती तसेच डॉ बाबासाहेबांच्या अस्थीस्तूपाचे सकाळ पासून रांगा लावून मनोभावे दर्शन घेतले. बुद्धविहारा लगत मैदानावर आयोजित महा बुध्दवंदनेला विविध भागातून आलेल्या भंतेंसह सुमारे लाखाहून अधिक बौद्ध अनुयायांची उपस्थिती होती.
भन्तेंच्या हस्ते बुद्ध व डॉ आंबेडकर यांचे प्रतिमांचे पुष्पार्पण व दीप (मेणबत्ती प्रज्वलित करून) लावून पूजन करण्यात आले. महाबुध्दवंदना, शीलयाचना, क्षमायाचना, अभिवादन गाथा, बुध्दपूजा , भीमस्मरण, त्रिसरण, बुद्धवंदना सकाळी अकरा ते दुपारी एकच्या दरम्यान संपन्न झाली. त्यानंतर संघवंदना, भिखू आशीर्वचन संपन्न होवून बावीस प्रतिज्ञा घेण्यात आल्या. धम्मपालन गाथा घेण्यात आली. भगवान बुद्ध व स्तुपाचे बांधवांनी रांगेत दर्शन ऐतिहासिक बुद्धविहारातील बुद्ध मूर्ती व डॉ आंबेडकरांच्या अस्थीस्तुपाचे दर्शनासाठी पुणे,पिंपरी चिंचवड, मावळ -मुळशीसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या बौद्ध बांधवांनी सकाळपासून गर्दी केली होती. परिसरात रांगा लावून शिस्तीत दर्शन घेतले जात होते.मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे, भारतीय बौद्ध महासभेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ, सरचिटणीस राधाकांत कांबळे, देहूरोड शहराध्यक्ष संजय आगळे याच्यांसह विविध राजकीय पक्ष, सेवाबावी संस्था व सामाजिक संघटना, प्रतिष्ठाने समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बुद्धमुर्तीचे दर्शन घेऊन डॉ बाबासाहेब यांच्या अस्थिस्तुपाचे दर्शन घेत अभिवादन केले.
देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. देहूरोड वाहतूक विभागाने वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्याकरिता सार्वजनिक वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला होता. मात्र तरीदेखील भीम अनुययांच्या गर्दीने जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर सकाळी वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती.