मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर मनोरंजन क्षेत्रात एकाच गोंधळ उडाला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहेत. याप्रकरणी तुनिषाचा कथित प्रियकर शिझान खानला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आता या प्रकरणाला भाजपा आमदार व मंत्र्यांकडून लव्ह जिहादचे वळण देण्यात आले असल्याचे दिसून येत आहे.
भाजपा नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी याप्रकरणी,“हे प्रकरण लव्ह जिहादचा विषय आहे आणि पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आम्ही पाहत आहोत की, दिवसेंदिवस ही प्रकरणं वाढतच आहेत आणि आम्ही या विरोधात कडक कायदा आणण्याचा विचार करत आहोत.” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सहायक पोलीस आयुक्त(एसीपी) चंद्रकांत जाधव यांनी सांगितले आहे की, आतापर्यंत कोणत्याही अन्य प्रकाराची, ब्लॅकमेलिंग किंवा लव्ह जिहादबाबत काही ठोस माहिती हाती आलेली नाही. पोलिसांचे तपासकार्य सुरू आहे आणि आरोपी शिझान आणि तुनिषाचे फोन ताब्यात घेण्यात आले आहेत.
याशिवाय, एका इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलताना भाजपा आमदार राम कदम यांनी या प्रकरणाची पोलीस कसून चौकशी करतील असे मत व्यक्त केलेले आहे. तसेच चौकशीत लव्ह जिहादचा अँगल समोर आला तर त्यादृष्टीने देखील सखोल चौकशी होईल, असे म्हटले आहे. लव्ह जिहादच्या मागे कोणती संघटना आहे का? त्यांचे काय षडयंत्र आहे? याचाही तपास पोलिस करतील आणि तुनिषाच्या कुटुंबाला न्याय मिळवून देतील, असे राम कदम यांनी म्हणाले आहेत.