पिंपळे गुरव – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी नागरिकांना तगादा लावण्यात येत आहे. महापालिकेच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने पाणी व घरपट्टी भरता येते. परंतु अजूनही शहरात संगणक साक्षर व ऍन्ड्रॉइड मोबाइल नसल्याने ते महापालिकेच्या कर संकलन विभागात येतात. परंतु तेथे अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिकेने नागरिकांची होणारी गैरसोय थांबवावी, अशी मागणी होत आहे.
एकीकडे महापालिकेकडून टॅक्स भरण्यासाठी तगादा लावण्यात येत आहे. परंतु दुसरीकडे स्वतः नागरिक कर संकलन विभागात येऊन टॅक्स भरण्यासाठी तयार असताना कर्मचारीच कार्यालयात नसल्याने नागरिकांना रांगेत उभा राहून वाट पाहवी लागत आहे. सांगवी, पिंपळे गुरव, नवी सांगवी आदी परिसरातील नागरिक पाणीपट्टी व घरपट्टी भरण्यासाठी जुन्या सांगवीतील गजानन महाराज मंदिराजवळील कर संकलन विभागात येतात. परंतु अधिकारी व कर्मचारी सातत्याने अनुपस्थित असल्याने नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधित विभागात कर्मचारी उपस्थित नसल्याबाबत चर्चा केली असता अधिकारी इलेक्शन ड्युटीवर गेल्याची कारणे सांगितली जात आहेत. त्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
पर्यायी कर्मचारी नियुक्त करा
जुन्या सांगवीतील कर संकलन विभागात कर भरण्यासाठी आले तर बहुतांश वेळा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. संबंधित विभागात चौकशी केली असता अधिकारी इलेक्शन ड्युटीसाठी बाहेर गेले आहेत. अशी कारणे दिली जात आहेत. त्यामुळे नागरिकांची व ज्येष्ठांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पर्यायी कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे आवश्यक आहे.
आम्ही गेले दोन-तीन दिवसांपासून कर भरण्यासाठी कर संकलन विभागात चकरा मारत आहे. शिवाय कर भरण्यासाठी लावलेल्या रांगेत आम्ही अक्षरशः तीन ते चार तास उभा राहिलो. परंतु अधिकारी व कर्मचारी आले नाहीत. शेवटी आम्हाला सांगण्यात आले की कर्मचारी इलेक्शन ड्युटीवर गेले आहेत. त्यामुळे आमचा वेळ तर वाया गेलाच परंतु मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
– बापू लोखंडे, नागरिक
सध्या कर संकलन विभागाचे कामकाज सुरळीत सुरू आहे. मागील दोन तीन दिवसांपूर्वी इलेक्शनच्या कामासाठी अधिकारी बाहेर गेले होते. परंतु आता सर्व कामकाज सुरळीत सुरू आहे.
– अर्चना कानडे, कर संकलन विभाग, सांगवी.
मी स्वतःही दोन ते तीन वेळा कर संकलन कार्यालयात जाऊन आलो. त्या ठिकाणी कर्मचारी नव्हते. यामुळे नागरिक नाराज झाले आहेत. याकडे पालिका प्रशासनाने लक्ष द्यावे. एकीकडे महापालिका कर भरण्यासाठी नागरिकांना नोटीस पाठवत आहे. तर दुसरीकडे नागरिक कर भरण्यास येतात पण अधिकारी उपस्थित नाहीत.
– अण्णा जोगदंड, ह्यूमन राइट्स.