सातारा – लव्ह जिहाद, धर्मांतर यासारख्या घटनांकडे सातारा जिल्ह्यातील काही अधिकारी दुर्लक्ष करत हिंदूविरोधी भूमिका घेत आहेत. अशा अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशारा भाजपाचे आ. नितेश राणे यांनी दिला. राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा करण्यात येईल. अशी ग्वाही त्यांनी दिली.
पाटण येथे हिंदू आक्रोश मोर्चाला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी येथील विश्रामगृहामध्ये माध्यमांशी संवाद साधला. राणे म्हणाले, “”पाटण तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला. अत्याचार करणाऱ्या प्रवृत्तींचा विरोध करण्यासाठी पाटण येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला. अत्याचार झाला ती मुलगी व तिचे कुटुंबीय दहशतीखाली आहे. तिची व तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली.
त्यांना धीर दिला. मुलीला शाळेत जाण्यासाठी अथवा घराबाहेर पडण्यासाठी भीती वाटतेय. आज मोर्चा काढला तरी उद्या धमक्या मिळणार नाहीत ना अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना वाटत आहे. मात्र, सध्या राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. हिंदूनी घाबरण्याचे कारण नाही.” श्रद्धा वालकरची हत्या करून तिचे 35 तुकडे करण्यात आले होते.
असे प्रकार महाराष्ट्रात सर्रास घडत आहेत मात्र ते होऊ नये याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे सांगून राणे यांनी अशा प्रवृत्तीच्या व्यक्ती निदर्शनास आल्यास त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची गरज व्यक्त केली. सातारा, फलटण, पाचगणी, आणि महाबळेश्वर येथील काही पोलीस अधिकाऱ्यांची यादी तयार केली असून ती यादी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देऊन संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार आहोत, असा इशाराही त्यांनी दिला.