सातारा – सदरबझारमधील मोना स्कूल जवळील अपार्टमेंटमधील फ्लॅट काल दुपारी फोडत चोरट्यांनी 3 लाख 30 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.
सदरबझारमधील मोना स्कूलजवळील किरण अपार्टमेंटमध्ये प्रियांका अमित लाड राहतात. काल सकाळी दहाच्या सुमारास त्या कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. दरम्यानच्या काळात चोरट्यांनी फ्लॅटच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी आतमधील साहित्य अस्ताव्यस्त फेकत त्यातील चार तोळ्यांचे मंगळसूत्र, 1 तोळ्याची चेन, 7 ग्रॅमचे मिनी मंगळसूत्र तसेच वेढणे, टॉप्स, मंचली असे सुमारे दोन तोळ्यांचे इतर दागिने चोरुन नेले.
दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी परतल्यानंतर प्रियांका लाड यांना चोरी झाल्याचे आढळले. याची माहिती त्यांनी फोनवरुन सातारा शहर पोलिस ठाण्यास दिली. माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करत तपासाच्या सूचना कर्मचाऱ्यांना दिली. याची तक्रार प्रियांका लाड यांनी शहर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. यात त्यांनी चोरट्यांनी 3 लाख 30 हजारांचे सोन्याचे दागिने
चोरुन नेल्याचे नमूद केले आहे. महिला उपनिरीक्षक मोटे तपास करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरात घरफोडीच्या प्रकारांत वाढ झाली असून पोलिसांनी त्या रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.
==================