वाघोली -येथील चोखीढाणी रस्त्यालगत एका कामगाराचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. या खुनाचा लोणीकंद पोलिसांनी 36 तासांत उलगडा केला आहे. याप्रकरणी खून झालेल्याच्या दोन मित्रांना पोलिसांनी अटक केली आहे.
दत्ता लक्ष्मण बंडगर (वय 37) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. खूनप्रकरणी सागर कैलास पवार (वय 27), बालाजी किसन गारे (वय 29, दोघेही रा. वाघोली) यांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील नाक्यावरील कामगार दत्ता बंडगर हे रविवारी (दि. 19) सकाळी कामासाठी गेले होते.
मात्र, रात्री कामावरून परतले नाही. दरम्यान, चोखीढाणी रस्त्यावरील पोदार स्कूलजवळ एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या व्यक्तीची ओळख अध्याप पटली नसल्याने प्रसारमाध्यमे व सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ही व्यक्ती वाघोली येथील कामगार बंडगर असल्याचे समजले. नातेवाईकांनी ओळख पटविल्यानंतर लोणीकंद पोलिसांनी तत्काळ मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी सूत्रे हलविली.
पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर बंडगर याचा बांधकाम साईटवरील लेबर कॅम्पचा मित्र सागर पवार व बालाजी गारे यांना ताब्यात घेतले. तिघेही मजुरीचे मिळेल ते काम करीत होते. खून झाला त्यादिवशी तिघांनी चोखीढाणी रस्त्याजवळ एकत्रित दारू प्राशन केली होती.
त्यावेळी जुन्या भांडणावरून वाद झाल्याने पवार याने मित्र गारे याच्या मदतीने बंडगर याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबुली दिली. या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, संतोष मारकड, दत्तात्रय काळे, समीर पिलाणे, ऋषिकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांच्या पथकाने केली.