पिंपरी चिंचवड : आकुर्डीत टोळी युद्धाचा भडका;खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल

पिंपरी (प्रतिनिधी)- पिंपरी चिंचवड शहरात टोळी युद्धाचा भडका उडाला आहे. गोल्डन ग्रुप आणि बी. वाय. बॉईज या दोन टोळ्यामध्ये तुफान हाणामारी झाली. ही घटना बुधवारी रात्री आकुर्डी येथे घडली. याप्रकरणी खूनी हल्ल्याचे परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

साहिल ऊर्फ खाऱ्या तानाजी जगताप (वय 22, रा. बौद्धनगर, आकुर्डी) याने गुरुवारी (दि. 18) निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बॉबी ऊर्फ सुरेश यादव (वय 30), विकी ऊर्फ कांच्या वाघ (वय 22), सनी सरपट्टा (वय 26), गुंड्ड्या सरपट्टा (वय 25), प्रसाद ऊर्फ लंब्या सुतार (वय 27, सर्व रा. पंचतारानगर, आकुर्डी), कल्पेश (पूर्ण नाव माहिती नाही), जिग्नेश सावंत (वय 27, रा. सुखवानी प्लाझा, आकुर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पांढारकर सभागृहाच्या आवारात सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादी खाऱ्या याला सिमेंटच्या गट्टूने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक धुमाळ याबाबत अधिक तपास करीत आहेत.

लिलावती शंकर माळी (वय 50, रा. भाऊ पाटील चाळ, आकुर्डी) यांनी गुरुवारी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खाऱ्या जगताप, बाबू सुर्वे, शंकर दाते, नितीन सोनावणे, कृष्णा इटकर, सलम्या खान, आबु शेख, सोया रट्टे, सनी तलवार (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना बुधवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास भाऊ पाटील चाळ, आकुर्डी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी लिलावती, त्यांची मुलगी, मुलगा, शेजारी राहणारा ओंकार, यांना आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडके, दगड, विटांनी मारहाण करून परिसरात दहशत निर्माण केली. सहायक निरीक्षक प्रशांत आरदवाड याबाबत अधिक तपास करीत आहेत.

आकुर्डी परिसरातील फेरीवाल्यांकडून हप्ते गोळा करणे, परिसरातील वर्चस्व यावरून खाऱ्या जगताप यांच्या गोल्डन ग्रुप आणि बॉबी यादव याच्या बी. वाय. बॉईज या ग्रुपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत. यापूर्वीही त्यांच्यात अनेकदा हाणामाऱ्याही झाल्या आहेत. मात्र खाऱ्या आणि बॉबी हे काही वर्ष शहरात वास्तव्यास नव्हते. त्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात हाणामाऱ्या झालेल्या नाहीत. खाऱ्या जगताप आणि बॉबी यादव हे दोघेही काही महिन्यांपूर्वीच शहरात पुन्हा वास्तव्यास आले असून त्यांच्यात पुन्हा आकुर्डी परिसरातील वर्चस्वातून वाद सुरू झाला. याच वादातून बी. वाय. बॉईज टोळी आणि गोल्डन ग्रुप टोळी यांच्यात बुधवारी रात्री पुन्हा टोळी युद्ध झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.