पिंपरी – मोबइल लोन (कर्ज) करून देतो, असे सांगत खासगी बॅंकेचा एक्झीकेटीव्ह असणाऱ्याने वाहन चालक असणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीकडून त्याची कागदपत्रे घेतली. या कागदपत्रांच्या अधारे तसेच बनाव सही करून संबंधित व्यक्तीच्या नावाने बॅंकेतून ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढत फसवणूक केली. ही घटना १४ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीत पुनावळे येथे घडली.
सिकंदर श्रावण भालेराव (वय ४३, रा. पुनावळे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी शरद बाळू जाधव असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी जाधव हा एका खासगी बॅंकेचा एक्झीकेटीव्ह म्हणून काम करतो. नागरिकांना मोबाइल घेण्यासाठी बॅंकेकडून कर्ज मिळवून देण्याचे काम त्याला सोपविण्यात आले होते. त्यासाठी तो वेगवेगळ्या मोबाइल शॉपमध्ये जाऊन बसत असे. जुलै महिन्यात पुनावळे येथील साई सिद्धी मोबाइल सेंटर येथे तो बसला होता. त्यावेळी फिर्यादी तेथे मोबाइल घेण्यासाठी आले.
मोबाइलसाठी कर्ज होईल का असे त्यांनी विचारले असता, आरोपीने मी कर्ज मिळवून देतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादी यांची सर्व कागदपत्रे घेऊन कर्जासाठीची प्रक्रिया पुर्ण केली. मात्र, कर्ज मिळण्यात काहीतरी अडचण येत आहे, असे सांगत त्याने फिर्यादी यांना बॅंकेचे कर्ज मिळवून दिले नाही. त्यानंतर फिर्यादी यांनी दुसऱ्या बॅंकेचे लोन करून मोबाइल खरेदी केला.
मात्र, डिसेंबर २०२३ मध्ये त्यांना आयसीआयसी बॅंकेतून फोन आली की, तुम्ही गेली सहा महिने मोबाइल लोनचे हप्ते भरले नाही. त्यावेळी त्यांनी चौकशी केली असता आपल्या नावावर जुलै महिन्यात ४९ हजार ९३८ रुपयांचे कर्ज काढल्याचे त्यांना समजले. तसेच ही रक्कम व्याजासह ५५ हजार २२९ एवढी झाली असल्याचेही त्यांना बॅंकेने सांगितले. त्यानंतर फिर्यादी भालेराव यांनी तातडीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तपास करत आरोपी जाधव याला अटक केली आहे.