पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागातील महत्त्वाच्या रस्त्यांसह गल्ली-बोळांतील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. मात्र, हे करीत असताना रस्त्यांवर खड्डे केले जाऊ नयेत यासाठी अनेक गणपती मंडळांच्या मांडवांसाठी कायमस्वरूपी खड्डे तयार करून त्या खड्डयांमध्ये लोखंडी पाइप टाकून साचे तयार केले गेले आहेत. गणेतोत्सव झाल्यानंतरही हे खड्डे कायमस्वरूपी असल्याने ते तसेच ठेवले जात असून, या खडड्यांमध्ये पाय अडकून नागरिक पडत असून, जखमी होत आहेत.
शहरात विविध ठिकाणी गणपती मंडळे मांडव घालण्यासाठी रस्त्यावर खड्डे करतात. हे खड्डे मांडवांच्या आकारानुसार केले जातात आणि त्यात खांब रोवले जातात. हे खांब रोवताना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पूजा करून उत्सवाची सुरुवात केले जात आहे. मात्र, हे खड्डे रस्त्यावर केले जात असल्याने कॉंक्रिटीकरण झालेल्या रस्त्यांना खड्डे पाडले जाऊ नयेत यासाठी मांडवांच्या आकारानुसार लोखंडी पाइप टाकून कायमस्वरूपी साचे केले गेले आहेत. उत्सव काळात या साच्यांमध्य खांब रोवून मांडव घातले जातात.
उत्सव संपल्यानंतर या साच्यांमधून खांब काढून टाकले जात असले तरी ते साचे तसेच उघडे ठेवले जात आहेत. हे साच्यांचे खड्डे पुढे वर्षभर तसेच उघडे ठेवले जात असून, यात पाय अडकून नागरिकांना दुखापत होत आहे. हे साचे असलेले खड्डे उत्सव संपल्यानंतर पुढील काळात त्वरित बंद करणे गरजेचे आहे.
कायमस्वरूपी खड्ड्यांसह इतरही खड्डे
एखाद्या मांडवासाठी ६ कायमस्वरूपी खड्डे ठेवले असले तरी नंतर मांडव मोठा झाला तर त्यासाठी कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यावर कायमस्वरूपी खड्ड्यांच्या बाजूला दुसरे खड्डे खणले जातात. एका मांडवासाठी असे साधारण १० ते १२ खड्डे केले जात आहेत. मूळचे कायमस्वरूपी ६ खड्डे आणि नव्याने केलेले पुढचे खडड्े धोकादायक ठरत आहेत.