पिंपरी – रत्नागिरी येथे 15 ते 17 फेब्रुवारी सुरू असणाऱ्या शिक्षकांच्या राज्यव्यापी अधिवेशन आणि शिक्षण परिषदेला शहरातील तब्बल 500 शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली आहे. करोनामुळे दोन वर्षे अधिवेशन झाले नव्हते. त्यासाठी सध्या होणाऱ्या अधिवेशनाला स्वखर्चाने शिक्षक रवाना झाले आहेत. तीन दिवस शहरातील महापालिकेच्या 110 प्राथमिक शाळांची मदार अवघ्या 620 शिक्षकांवर आणि मानधनावरील शिक्षकांवर आली आहे.
शिक्षकांच्या अधिवेशनात विविध रखडलेल्या मागण्यांबाबत चर्चा केली जाते. त्यासाठी दरवर्षी अधिवेशन आणि शिक्षण परिषदेचे आयोजन केले जाते. राज्यभरातून शिक्षक त्याला उपस्थित राहतात. पिंपरी-चिंचवड शहरातील शिक्षकांनीही यंदा अधिवेशनाला उपस्थिती दर्शविण्याबाबत सकारात्मकता दाखवली होती. त्यानुसार आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांकडे त्यांनी रजा मंजुरीसाठी अर्जही केला होता. त्यांना रजा देखील मंजूर झाल्या असल्याचे महापालिका शिक्षण प्रशासन विभागाकडून सांगण्यात येत आहे. त्यांच्या अनुपस्थितीत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षण विभागाच्या प्रशासनाने परिपत्रक काढले होते. त्यामध्ये शाळा बंद न करण्याच्या सूचना मुख्याध्यापकांना दिल्या होत्या.
मानधनावरील शिक्षकांवर शिकविण्याची धुरा देण्यात आली होती. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 110 प्राथमिक शाळा आहेत. त्यामध्ये 39 हजार 892 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर प्राथमिक शिक्षकांची संख्या 1 हजार 120 आहे. त्यातील सुमारे 500 गेल्याने अवघ्या 620 शिक्षक व मानधनावरील शिक्षकांना तीन दिवस शाळांची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. तसेच चिंचवड विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक असल्याने त्याठिकाणी 300 बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) म्हणून शिक्षक रुजू आहेत. त्यामुळे शिक्षकांची संख्या कमी पडत आहे.
या परिषदेनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना भेटून विविध रखडलेले प्रश्न सोडविण्यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाकडून सांगण्यात येत आहे. जुनी पेन्शन, बीएलओची व अतिरिक्त कामांचे ओझे, शिक्षकांच्या विरोधात गेलेले शासनाचे जीआर आदीबाबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
किती शिक्षक गेले आहेत, याबाबत माहिती घेतलेली नाही. मात्र 500 शिक्षक जाणार होते. त्यांची रजा देखील मंजूर झाली आहे. मात्र त्यांच्या अनुपस्थितीत पर्यायी सोय करण्याची सूचना मुख्याध्यापकांना दिली होती. त्यानुसार शहरातील शाळा बंद न ठेवता इतर शिक्षकांवर चालू आहेत.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी, शिक्षण विभाग