पिंपरी -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्रमांक 12 येथील गृहयोजनेतील सदनिकांसाठीची ई-नोंदणी प्रक्रिया सोमवार (दि. 6)पासून सुरू करण्यात येणार आहे.
पीएमआरडीएने पेठ क्रमांक 12 येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकासाठी 3 हजार 317 सदनिका व अल्प उत्पन्न गटासाठी 1 हजार 566 सदनिका अशा एकूण 4 हजार 883 सदनिकांचा गृहप्रकल्प राबविला आहे. गृहप्रकल्पातील सदनिकांची लॉटरी पध्दतीने विक्री करण्यात आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांनी सदनिकेची पूर्ण रक्कम भरलेली आहे, त्यांच्या समवेत आर्टिकल ऑफ ऍग्रीमेंट करण्याच्या प्रक्रियला सोमवारपासून (दि. 6) ई-नोंदणी पध्दतीने सुरुवात होणार आहे. ई-नोंदणी प्रक्रियेची सुविधा नोंदणी महानिरीक्षक यांचेकडून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास उपलब्ध करुन दिली असल्यामुळे लाभार्थ्यांना दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागणार नाही. ई-नोंदणीच्या इमारतीनिहाय वेळापत्रक ऑनलाइन पोर्टलवर लाभार्थ्यांसाठी प्रसिध्द करण्यात आलेले आहे.
निगडीतील पेठ क्रमांक 24 येथील जुन्या प्राधिकरण कार्यालयात ई-नोंदणी प्रक्रिया पार पडणार आहे. लाभार्थ्यांना नोंदणीच्या प्रक्रियेबाबतच्या सविस्तर सूचना पोर्टलवर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. लाभार्थ्यांना नोंदणीसाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे शुल्क (सदनिका विक्री किंमतीचा शेवटचा हप्ता, विलंब शुल्क, स्टॅम्प ड्युटी, सोसायटी नोंदणी शुल्क, देखभाल खर्च वगैरे) अदा करणे अनिवार्य आहे. शुल्क नोंदणी वेळापत्रकाच्या किमान 4 दिवस आधी भरणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी येताना आधार कार्ड, पॅन कार्ड व ओटीपीसाठी आधारकार्डला लिंक असणारा मोबाइल सोबत घेऊन यावे.
नोंदणी प्रक्रियेनंतर सोसायटी नोंदणी प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होऊन तात्काळ ताबा देण्याची कार्यवाही करता येणार आहे. सोमवारी (दि. 6) सकाळी अकरा वाजता नोंदणी महानिरीक्षक तथा मुख्य नियंत्रक यांच्या हस्ते आणि प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांच्या उपस्थितीत ई-नोंदणी प्रक्रियेचा शुभारंभ होणार आहे.