पिंपरी, दि. ५ (प्रतिनिधी) – भोसरी एमआयडीसी टी ब्लॉक येथील महात्मा फुले नगरसमोरील औद्योगिक परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने उद्योजकांचे मोठे नुकसान होत आहे. मंगळवारी दुपारी खंडित झालेला वीजपुरवठा बुधवारी दुपारी सुरू झाला यामुळे येथील अनेक उद्योगांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले.
येथील अंडग्राउंड वीज वाहिन्या खूप जुन्या असून त्यात वारंवार बिघाड होत असतो. मंगळवारी दुपारी देखील वीजपुरवठा खंडित झाला. बुधवारी सकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत न झाल्याने उद्योजक आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेतली. त्यानंतर सुमारे चार तासांनी वीज पुरवठा सुरळीत झाला. तोपर्यत येथील शेकडो कामगारांना बसून रहावे लागले.
या परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. वीज वाहिन्या खराब झाल्या आहेत आणि ट्रान्सफॉर्मर देखील दूर आहे. महावितरणकडून काही होत नसल्याचे पाहून उद्योजकांनी पैसे गोळा करुन अंडरग्राउंड वाहिन्या तपासण्यासाठी खोदकाम केले. सर्व उद्योजकांनीच करायचे असेल तर महावितरणचे ठेकेदार काय काम करतात? महावितरणच्या अधिकार्यांची भेट घेतल्यानंतर वीजपुरवठा चार तासांत सुरळीत झाला. परंतु यावर कायमस्वरुपी उपाययोजना होणे गरजेचे आहे.
– अभय भोर, अध्यक्ष, फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन