पिंपरी – शाळांना दिवाळीची सुट्टी लागली आहे. याशिवाय शासकीय, निमशासकीय व खासगी कर्मचारी दिवाळीचे पाच ते सहा दिवस सुट्यांचा आनंद घेत असल्याने या काळात घरे बंद करून बाहेर गावी जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. वर्षभरात सर्वाधिक चोरी-घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दिवाळीच्या सुट्यांमध्ये घडतात. त्यामुळे या कालावधीत खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वसूबारसपासून ते भाऊबिजेपर्यंत शनिवारचा अपवाद वगळता सलग दिवाळी साजरी होईल. याच काळात नोकरदार, कामगारांना सलग सुट्या मिळतात. विद्यार्थ्यांच्या सत्र परीक्षा आटोपल्याने दिवाळीच्या सुट्यांचा काळ असल्याने पालक मुलांसह पर्यटनाप्रमाणे नातेवाइकांकडे जाण्याचा बेत आखतात. पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर इतर जिल्ह्यातील नोकरदार, कामगार वर्ग आहे.
सुमारे तीस लाख लोकसंख्येच्या पिंपरी-चिंचवड शहरात सरकारी, खासगी नोकरदार, कामगार आणि मजूर, दुकानदार, व्यावसायिक, कारखानदार दिवाळी साजरा करत असल्याने नियोजनाप्रमाणे सुट्टयांचा कालावधी ठरलेला असतो. चोरट्यांकडून ही संधी हेरुन चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे घर-कारखाना, दुकाने बंद करून जाताना विशेष काळजी घेणे अपेक्षित आहे.
ही खबरदारी घ्या-
अपार्टमेंट-सोसायटीत “नाइट व्हिजन’ कॅमेरे कार्यान्वित करावेत.
घराबाहेर रात्री पुरेशा उजेडाची सोय करावी.
अधिक कुटुंबे बाहेरगावी जात असल्यास वॉचमन ठेवावा.
जवळच्या पोलीस ठाण्याचा संपर्क क्रमांक वॉचमनसाठी भिंतीवर लिहावा
घराच्या मुख्य दाराच्या कड्यांची मजबुती तपासून घ्यावी
लोखंडी ग्रिलचे “सेफ्टी डोअर’ असले तरी त्याला वायर लॉक लावावे
बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना माहिती द्यावी.
घरातील रोख रक्कम, दागिने विश्वासून नातेवाइकांकडे सुरक्षित ठेवावेत.