नगर –मराठा समाजाला मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कुणबीचा इम्पिरिकल डेटा शोधण्याची मोहीम जिल्ह्यात युद्धपातळीवर रविवारपासून सुरू झाली आहे. रविवारी पहिल्याच दिवशी केवळ राहुरी, जामखेड या दोन तालुक्यातील तब्बल दहा हजार कुणबीच्या नोंदी आढळून आल्या आहेत. राज्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर नोंदी नगर जिल्ह्यात आढळून आल्याने कुणबी नोंदी शोध मोहीमेचा नगर पॅटर्न राज्यासाठी पथदर्शी ठरला आहे.
मराठवाड्यात कुणबी नोंदी शोधमोहीम राबविण्यात येत आहे. आता संपूर्ण राज्यात ही मोहीम राबविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर विभाग व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याबरोबर तालुकास्तरावर कक्ष स्थापन केला असून या कक्षामार्फत शोध मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला असून निवासी जिल्हाधिकारी या कक्षाचे सदस्य सचिव आहेत. या समितीमध्ये जिलहा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (माध्यमिक) व सहाय्यक आयुक्ती (नगरपालिका प्रशासन).तालुकास्तरावर तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
त्यानुसार रविवारी कुणबी नोंदी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून पहिल्याच दिवशी 10 हजार नोंदी आढळून आल्या आहेत. नगर शहरातील वस्तूसंग्रहालयामुळे कुणबी नोंदी सापडणे सोपे झाले आहे. संग्रहालयात जुने रेकॉर्ड मोठ्या प्रमाणवर असून 1940 पासून नोंदी आढळून आल्या आहेत. यात नगर, राहुरी व जामखेड या तीन तालुक्यामधील दहा हजार नोंदी सापडल्या आहेत. मोडी लिपीमध्ये या नोंदी असल्याने याबाबत वस्तू संग्रहालयाचा आधार घेण्यात येत आहे. या सर्वाधिक जन्म-मृत्यूच्या नोंदींच्या रेकॉर्ड उपयोग झाला आहे. या नोंदीचे रेकार्ड चांगल्या पद्धतीने जपण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा फायदा झाला.
अशा पद्धतीने सुरू आहे शोध मोहीम
शासकीय विभागातील सर्व जुने कागदपत्र, रजिस्टर, कुळ नोंदवही, नागरिकांचे राष्ट्रीय रजिस्टर सहन वही. सातबारा उतारे, 1951 नमुना नंबर 1 नमुना नंबर 2, हक्क नोंद, जन्म-मृत्यू रजिस्टर गाव नमुना क्रमांक 14, शैक्षणिक अभिलेखे, प्रवेश निर्गम नोंदवही, जनरल रजिस्टर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अभिलेखे, नोंदवह्या, मळी नोंदवही, तोडी नोंदवही, आस्थापना अभिलेखे, कारागृह विभागाचे अभिलेखे, कच्चा कैद्यांची नोंद, पोलीस विभाग गाववारी, क्राईम रजिस्टर, खरेदी विकी,अशी 1967 पूर्वीच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.
स्थापन करण्यात आलेल्या कक्षाकडून 1967 पूर्वीच्या सहकारी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. त्यासाठी महसूल, मोजणी, शिक्षण, खरेदी विक्री, सैनिक कल्याण, भूमिअभिलेख, महापालिका, नगरपालिका, पोलीस, जात प्रमाणपत्र तपासणी विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना शोध माहीमेमध्ये सहभागी करून घेण्यात आले असून त्यानुसार हे सर्व विभाग रविवारपासून कामाला लागले आहेत. जिल्ह्यात यापूर्वीच कुणबी जात प्रमाणपत्र दाखल मिळविणारे 22 ते 23 हजार जण असून जिल्ह्यात यापूर्वीचे जुने रेकॉर्ड खूप चांगल्या पद्धतीने जपले आहे. त्यामुळे 1967 पूर्वीची कागदपत्र उपलब्ध होत आहे. जी फारच जुनी आहेत. त्याचे स्कॅसिंग करण्यात आले आहे. त्यामुळे नोंदी सापडणे सोपे झाले आहे.
सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी